प्रो-लीगमुळे कबड्डीला नवसंजीवनी

By Admin | Updated: September 4, 2014 00:02 IST2014-09-04T00:02:31+5:302014-09-04T00:02:59+5:30

कबड्डीपटूंची भावना : पुणे-फलटण संघांत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंचा समावेश

Kabaddi Invitation for Pro league | प्रो-लीगमुळे कबड्डीला नवसंजीवनी

प्रो-लीगमुळे कबड्डीला नवसंजीवनी

सचिन भोसले - कोल्हापूर --नुकतीच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सांगली येथे प्रो-लीग कबड्डी स्पर्धा झाली. त्याला सिनेअभिनेते, देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी क्रिकेट लीगप्रमाणे कबड्डीतही लीग सामने खेळवून प्रायोजकत्वाची मोठी भूमिका पार पाडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कबड्डीला एकप्रकारे नवसंजीवनीच मिळाल्याची भावना कबड्डीपटूंमध्ये निर्माण झाली आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या नवभारत क्रीडा मंडळाच्या विशाल तानवडे, सागर खटाळे यांनी पुणे-फलटण संघातून सहभाग घेतला होता.
कबड्डीला कुस्तीसारखीच अंगमेहनत करावी लागते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये यासाठी पोषक वातावरण आहे. येथे हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब येथील कबड्डी व कुस्तीपटू सरावासाठी येतात. मात्र, या वातावरणाचा लाभ कोल्हापुरातील खेळाडूंना करून घेता येत नाही. अशीच परिस्थिती कोल्हापुरातील संघांचीही झाली आहे.
एकेकाळी कोल्हापुरातील अनेक मंडळांतील खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करून स्पर्धाही गाजविल्या आहेत.
मात्र, सध्या कोल्हापुरातील कबड्डीला मरगळ आली आहे. नुकतेच आयलीग क्रिकेटसारखे देशांतर्गत विविध संघांत सामने खेळविण्यात आले.
त्यामध्ये जपान, श्रीलंका, थायलंड, पाकिस्तान, आदी देशांतील खेळाडूंबरोबर भारतातील अनेक नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा कोणी जिंकली यापेक्षा कबड्डीसारख्या खेळातही आयलीगसारखे ग्लॅमर व पैसा मिळू लागल्याने त्याला चांगले दिवस आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
कोल्हापुरातील (पुरुष) संघ
जयहिंद क्रीडा मंडळ (इचलकरंजी), जय किसान क्रीडा मंडळ (वडणगे), नवभारत क्रीडा मंडळ (पुलाची शिरोली), शाहू, सडोली क्रीडा मंडळ (सडोली खालसा), सह्याद्री क्रीडा मंडळ (कोल्हापूर), बालशिवाजी क्रीडा मंडळ (शिरोळ), छावा क्रीडा मंडळ (पुलाची शिरोली), राष्ट्रसेवा क्रीडा मंडळ (तळसंदे), किणी विद्यार्थी मंडळ (किणी), डायनॅमिक स्पोर्टस (इचलकरंजी), वारणा खोरा स्पोर्टस (कोडोली, वारणा), सनी स्पोर्टस (नागाव), शिवशाहू सडोली क्रीडा मंडळ (सडोली), आदी मंडळे कबड्डी खेळतात.
शिवछत्रपती पुरस्कारांत महिलांचाच वरचष्मा
मुलींमध्ये मुक्ता चौगुले, उमा भोसले, अनुराधा भोसले यांनी महाराष्ट्राचे व देशाचे नेतृत्व करताना अनेक मैदाने गाजविली. या महिला खेळाडूंना राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले. त्याचबरोबर रमेश भेंडीगिरी यांना दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित केले. मात्र, आजतागायत कोल्हापूर जिल्ह्यातील पुरुष खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आजतागायत या क्षेत्रातही महिलांचाच वरचष्मा राहिला असल्याचे चित्र आहे.

Web Title: Kabaddi Invitation for Pro league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.