जोतिबा मंदिर परिसरात सापडले ‘वीरगळ’
By Admin | Updated: January 21, 2017 00:45 IST2017-01-21T00:45:18+5:302017-01-21T00:45:18+5:30
११-१२ व्या शतकातील शिल्प : पाईपलाईनच्या खुदाईवेळी उघडकीस; पुरातत्त्व विभागाला माहिती देणार

जोतिबा मंदिर परिसरात सापडले ‘वीरगळ’
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी महापालिकेच्या वतीने पाईपलाईनच्या कामासाठी खुदाई सुरू असताना जमिनीखाली ‘वीरगळ’ हे शिल्प सापडले. सुस्थितीत असलेले, चार फूट उंचीचे हे शिल्प साधारण ११ व्या ते १२ व्या शतकातील आहे, अशी माहिती मूर्ती अभ्यासकांनी दिली.
अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाच्या पुढे जोतिबा रोड आहे. येथे गेल्या तीन दिवसांपासून गटारींच्या चॅनेलसाठी महापालिकेकडून खोदकाम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान एस. ओ. कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर संतोष चव्हाण यांच्यासह कर्मचारी जेसीबीने खुदाई करताना आधी दीड फूट उंचीचे एक दुभंगलेले शिल्प सापडले. त्यांनी दोरीच्या साहाय्याने दगड उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र ते शक्य झाले नाही; त्यामुळे जेबीसी यंत्राच्या बकेटद्वारे हे शिल्प जमिनीतून बाहेर काढण्यात आले. परिसरातील नागरिकांनी हे शिल्प स्वच्छ केल्यानंतर ते ‘वीरगळ’ असल्याचे लक्षात आले. या वीरगळावर अत्यंत सुबक असे कोरीव काम असून, ते अजूनही सुस्थितीत आहे. नगरसेवक अजित ठाणेकर व पोलिसदेखील येथे दाखल झाले. महापालिकेच्यावतीने या शिल्पाची माहिती पुरातत्त्व खात्याला देण्यात येणार आहे, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
बघ्यांची गर्दी आणि पूजा
येथे मूर्ती सापडल्याची माहिती कळल्यानंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. शिल्प मोबाईलमध्ये टिपण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली होती. सदर शिल्प देवाचे आहे की अन्य कोणते, त्याचे महत्त्व काय याची शहानिशा करण्याआधीच त्याची दुधाने अभिषेक घालून हळदी-कुंकू, फुले वाहून पूजा करण्यात आली.
सापडलेल्या शिल्पाची माहिती पुरातत्त्व खात्याला देण्यात येणार आहे. तोपर्यंत ते टाउन हॉल संग्रहालयाच्या आवारात ठेवण्याचे नियोजन आहे. आज, शनिवारी त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
-सुरेश कुलकर्णी, जल अभियंता
काय आहे ‘वीरगळ’
वीरगळ म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मृतिशिल्प. सापडलेले वीरगळ वीराचे असून त्याचे टप्पे खालून वर मोजतात.
खालच्या पहिल्या टप्प्यात घोड्यावर बसून युद्ध करणारा वीर दर्शविला आहे. मधल्या टप्प्यात शहीद वीराला देवलोकांत घेऊन जाणाऱ्या अप्सरा दाखविल्या आहेत.
अखेरीला पुरोहिताच्या साक्षीने शंकराची पूजा करून वीर कैलासात सालोक्य पावला, असे चित्रण या वीरगळात असते, अशी माहिती मूर्ती अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.