पंधरवड्यात जोतिबा देवस्थान प्राधिकरणाची स्थापणा; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

By विश्वास पाटील | Updated: March 6, 2025 23:56 IST2025-03-06T23:56:16+5:302025-03-06T23:56:35+5:30

पन्हाळा किल्ला शिवकालीन पुर्ननिर्मितीच्या आराखड्यास मंजुरी.

Jyotiba Devasthan Authority to be established within 15 days CM Fadnavis announces | पंधरवड्यात जोतिबा देवस्थान प्राधिकरणाची स्थापणा; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पंधरवड्यात जोतिबा देवस्थान प्राधिकरणाची स्थापणा; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

विश्वास पाटील, पन्हाळा : येत्या पंधरा दिवसांत वाडी रत्नागिरी (ता.पन्हाळा ) येथील जोतिबा देवस्थानचे प्राधिकरण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुुरुवारी रात्री येथे केली. पन्हाळा किल्ला शिवकालीन पुर्ननिर्मितीच्या आराखड्यासही मंजुरी देत असून त्या कामासाठी जो निधी लागेल तो देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक पन्हाळा गडावर साकारलेल्या १३ डी थियटर आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपटाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर अध्यक्षस्थानी होते. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरे आमदार झाल्यापासून जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा जोतिबा देवस्थानच्या प्राधिकरणाची एकच मागणी करत आले आहेत. आजपर्यंत त्यात अनेकांनी अडथळे आणले परंतू आता वेळ आली आहे. मी तुम्हांला येत्या १५ दिवसांत या प्राधिकरणाची स्थापना करून देतो. शिवकालीन इतिहास हा नुसता वाचण्याचा नसून तो जगण्याचा दस्तऐवज असतो. रायगडला गेल्याशिवाय आपले जीवन पूर्ण होत नाही तसेच या स्वराज्याच्या उपराजधानीला म्हणजे पन्हाळागडाला भेट दिल्याशिवाय जीवन पूर्ण होणार नाही एवढे महत्व या किल्ल्यास आहे. कोरे यांनी गडाचे ऐतिहासिक दस्तऐवज जमा केले. पूरातत्व विभागाच्या परवानगी घेवून गडाच्या विकासाचा आराखडा तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिला किल्ला असेल की त्याची आम्ही शिवकालीन पुर्ननिर्मिती करु. त्यानिमित्ताने आम्हांला इतिहासाशी जोडण्याची अत्युच्च संधी मिळत आहे.

आमदार कोरे म्हणाले, स्वराजाचे तख्त राखणारा हा पन्हाळागड आहे. ६ मार्च हा या गडाचा विजय दिवस आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेवून नव्या पिढीला या गडाचा इतिहास माहित करून देण्याचा प्रयत्न आहे. पन्हाळा गड आणि जोतिबा देवस्थान ही दोन्ही ठिकाणे जिल्ह्याच्या विकासाचे माध्यम म्हणून पाहत आहे. जोतिबा देवस्थानची राज्यात ३० हजार एकर जमीन आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात जमीन आहे. त्यामुळे त्याचे प्राधिकरण केल्याशिवाय आम्हांला ही सगळी जमीन एकत्र करता येणार नाही. हे देवस्थान म्हणजे चार राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी प्रमुख आध्यात्मिक केंद्र विकसित करायचे आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील २६५ कोटी रुपयांचा आराखडा आम्ही शासनाला आजच सादर केला आहे. त्यामध्ये मुळ देवस्थानचे संवर्धन आणि बारा जोतिर्लिंगाचे स्थान डोंगरावर स्थापित करण्याचे नियोजन आहे. तलावांची पुर्नबांधणी करणार आहे. कोणत्याही प्रकारचे विस्थापन न करता पहिला टप्पा करु.

कोरे मी तुम्हाला सॅल्यूट करतो : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी आमदार कोरे यांच्या या पन्हाळगडाचा जाज्वल्य इतिहास पुन्हा जिवंत करण्याच्या अलौकिक कामाचे तोंडभरून कौतुक केले. आमदार कोरे या कामाबध्दल मी तुम्हांला सॅल्यूट करतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. शासनाकडून मिळालेला निधी किती चांगल्या पध्दतीने खर्च करता येतो याचे हे काम म्हणजे उत्तम उदाहरण असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

इतिहास अनुभवता येणार..

आजपर्यंत छत्रपतींचा इतिहास आम्ही वाचला होता परंतू १३ डी तंत्रज्ञानामुळे हा अंगावर रोमांच उभा करणारा इतिहास प्रत्यक्ष जगता येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या कुणी याची निर्मिती केली त्या सर्वांचे मी कौतुक करतो. त्यांनी आम्हांला शिवकाळात नेले. राज्यातील सर्व आमदारांना हे थियटर पाहायला पाठवणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.

पन्हाळा-जोतिबा रोपवे

विविध २१ ना हरकत दाखले घेवून आम्ही पन्हाळा-जोतिबा रोप वे चा प्रस्ताव सादर केला आहे. परंतू तो प्रलंबित असून त्यालाही मंजूरी मिळावी अशी मागणी आमदार कोरे यांनी केली. दोन्ही ठिकाणी विकासाची ही कामे झाल्यावर वर्षाला किमान १० कोटी लोक याठिकाणी येतील. कुंभमेळ्यामळे जसे पर्यंटन बदलून गेले तसाच कायापालट या परिसराचा होईल असा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Jyotiba Devasthan Authority to be established within 15 days CM Fadnavis announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.