वारणानगर : श्रीक्षेत्र जोतिबा देवाची चैत्री यात्रा १ एप्रिलला होत असून, याची तयार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून वाद असलेली गिरोली (ता. पन्हाळा) येथील मानाची सासनकाठी क्रमांक ४५ (मूळ मालक कण्हेरखेड (जि. सातारा) यांचा वाद गतवर्षी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मध्यस्थीने मिटला होता. दोन्ही गावांनी संयुक्तपणे सासनकाठी नेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या निर्णयाची व आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने गिरोली ग्रामस्थ संतप्त झाले असून, यात्रा काळात दोन दिवस रास्ता रोको करण्याचा निर्णय गिरोली ग्रामस्थांनी घेतला आहे.जोतिबा यात्रेत सासनकाठींना मोठा मान आहे. यात्रेत सासनकाठी क्रमांक ४५ करिता देवस्थान समितीच्या दप्तरी कण्हेरखेड (ता.कोरेगाव, जि.सातारा) येथील अमृतराव शिंदे यांच्या नावे नोंद आहे; परंतु गिरोली (ता. पन्हाळा) येथील गावकरी शेकडो वर्षांपासून सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेर या नावाने मानाची सासनकाठी गुढी पाडव्यादिवशी धार्मिक विधी करुन परंपरेप्रमाणे उभी करून चैत्री यात्रेमध्ये संस्कृतीप्रमाणे सहभागी होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कण्हेरखेड गावच्या काही ग्रामस्थांनी या सासनकाठींवर मालकी हक्क सांगून गिरोली गावच्या स्थानिकांशी कोणतीही चर्चा न करता शेकडो वर्षांची परंपरा खंडित केली.गतवर्षी जिल्हाधिकारी येडगे यांच्या समोर सुनावणी झाली. जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढून सासनकाठीची पूर्वीप्रमाणेच मालकी ठेवत गुढीपाडव्यादिवशी कण्हेरखेड या गावी सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी सासनकाठीचे पूजन करावे व पाच प्रतिनिधींसह दुपारी तीन वाजता गिरोली ग्रामस्थांकडे सासनकाठी सुपुर्द करण्याचा आदेश २८ मार्च २०२५ रोजी दिला होता. गतवर्षी या आदेशाची अंमलबजावणी वेळेत झाली नाही.यावेळी गुढीपाडव्यादिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे गुढीपाडव्या दिवशी सासनकाठी गिरोली ग्रामस्थांकडे सुपुर्द करणे गरजेचे होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही सासनकाठी दाखल झाली नसल्याने शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. सासनकाठी आलीच नाही तर ३१ मार्च व १ एप्रिल या यात्रा काळात गाव बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी उपसरपंच बाबासाहेब हंबीरराव पाटील, युवराज पाटील, विद्यमान सरपंच श्रीमती छाया गुरव, उपसरपंच आनंदा पाटील व ग्रामस्थांनी वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी सांगितले.यावेळी गिरोली येथील सासनकाठी चालक बाबासाहेब पाटील, सत्यजित पाटील, तंटामुक्त अध्यक्ष वसंत पाटील, युवराज पाटील, भीमराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Summary : Giroli villagers are furious after not receiving the sacred staff for the Jyotiba Yatra, despite a collector's order. A road blockade is planned during the yatra to protest the broken tradition.
Web Summary : ज्योतिबा यात्रा के लिए पवित्र छड़ी न मिलने से गिरोली के ग्रामीण नाराज हैं, कलेक्टर के आदेश के बावजूद। टूटी परंपरा का विरोध करने के लिए यात्रा के दौरान सड़क जाम करने की योजना है।