गुन्हे उजेडात आणणारी ‘ज्योती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:53 AM2018-10-16T00:53:56+5:302018-10-16T00:54:28+5:30

कँटीन चालकाच्या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या मुलीने महाविद्यालयीन जीवनापासूनच महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे सुरू केले. ग्रामीण भागातील महिलांना भेडसावणाऱ्या दारूबंदीविषयी आवाज उठवत, प्रस्थापित लोकांचा विरोध मोडून काढत, जिल्ह्यातील चर्चित अशी दारूबंदी घडवून आणण्याचा पाया रचला.

 'Jyoti' brought to light | गुन्हे उजेडात आणणारी ‘ज्योती’

गुन्हे उजेडात आणणारी ‘ज्योती’

Next

- असिफ कुरणे, कोल्हापूर.


कँटीन चालकाच्या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या मुलीने महाविद्यालयीन जीवनापासूनच महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे सुरू केले. ग्रामीण भागातील महिलांना भेडसावणाऱ्या दारूबंदीविषयी आवाज उठवत, प्रस्थापित लोकांचा विरोध मोडून काढत, जिल्ह्यातील चर्चित अशी दारूबंदी घडवून आणण्याचा पाया रचला. त्यातून एकाचवेळी चार बीअरबार, वाईन शॉप, दोन देशी दारू दुकानांना टाळे लागले. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवत पोलीस खात्यात महत्त्वाचे पद मिळविले आणि त्या माध्यमातून सध्या गुन्हे, काळे कारभार उजेडात आणण्याचे काम त्या करत आहेत. ज्योती क्षीरसागर असे या नवदुर्गेचे नाव.

पुणे येथील सीआयडी मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षक असलेल्या ज्योती क्षीरसागर या शिवाजी विद्यापिठात (बी. एफ.टी.एम.) शिक्षण घेत असतानाच महिला सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, जनजागृती अशा कामात स्वत: हिरीरिने पुढाकार घेत होत्या. वाठार येथील जागृती युवा मंचच्या अध्यक्ष म्हणून काम करताना गावात पहिली महिला ग्रामसभा घडवून आणली. स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. त्याची परिणती म्हणून गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळाला. मुलींना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, सामाजिक उपक्रम आयोजित केले.

पोलीस अधिकारी होणे हे ज्योती यांचे स्वप्न होते आणि या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. पोलीस, सरकारी नोकरी अशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील असलेल्या ज्योती यांनी कष्टाच्या बळावर यश मिळविले. फक्त सरकारी नोकरी मिळविणे हा त्यांचा उद्देश नव्हता. समाजासाठी खासकरून महिला, मुलींसाठी आपण काही तरी केले पाहिजे या भावनेने त्यांनी विक्रीकर निरीक्षक पद नाकारत पोलीस खात्यात जाण्याचा प्रयत्न कायम ठेवला. त्यांच्या प्रयत्नांना २००९ मध्ये यश मिळाले. ज्योती या पोलीस उपअधीक्षकपदासाठी महिलांत ओबीसी प्रवर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अहमदनगर येथे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविणे सुरू केले. अवैध धंदे, देह व्यापाराविरोधात त्यांनी धडक मोहीम उघडून अनेक ठिकाणी छापे टाकले. तसेच पीडित महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठविले. श्रीरामपूर येथील दूध भेसळ प्रकरण उघड केले. श्रीगोंदा येथील गंभीर गुन्हे नोंद असलेल्या फरार टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी त्यांनी केली. गेवराई येथे उपविभागीय पोलीस अधिकारी असताना त्यांनी कारवाईचा धडाका लावला होता.

२०११ मध्ये वाळू माफियांविरोधात धडक कारवाई राबविल्याने त्यांची बीड जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती.
राज्यातील बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यांचा तपास सध्या त्यांच्याकडे आहे. समृद्धी जीवन समूहाच्या गैरव्यवहारांचा तपास त्या स्वत: बघत आहेत. ३७०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लाखो सर्वसामान्य लोकांचे पैसे अडकलेले असून, त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ज्योती यांच्या खाद्यांवर आहे. पोलीस खात्यात काम करीत असतानादेखील त्या महिला, मुलींच्या प्रश्नांवर सक्रिय असतात. व्हीपीपीओ, ग्रामसुरक्षा दल यांसारख्या सामाजिक उपक्रमांतून त्यांनी सोशल पोलिसिंगचे काम उत्कृष्ट पद्धतीने केले आहे.


लेडी सिंघम म्हणून दबदबा
बीडमधील गाजलेल्या स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाच्या तपासात ज्योती क्षीरसागर यांचा प्रमुख सहभाग होता. गेवराई येथे गाजलेले घाडगे खून प्रकरण, जदीद जावळा बलात्कार प्रकरण मार्गी लावल्यानंतर लेडी सिंघम म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस महासंचालक यांनी ज्योती क्षीरसागर यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
 

आर्थिक गुन्हे, सायबर क्राईम यांसारख्या आव्हानात्मक आणि दररोजच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात काम करणे मला आवडते. महिला, सर्वसामान्य लोकांच्या समस्या, प्रश्नांवर पोलीस खात्याच्या माध्यमातून समाधान शोधण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो.
- ज्योती क्षीरसागर, पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी, पुणे

Web Title:  'Jyoti' brought to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.