जयसिंगपूर पालिकेची करवसुलीसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST2020-12-08T04:20:02+5:302020-12-08T04:20:02+5:30
जयसिंगपूर : नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात महत्त्वाचा वाटा असलेल्या मालमत्ता कर वसुलीची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. मागील थकीत ९५ लाख, ...

जयसिंगपूर पालिकेची करवसुलीसाठी मोहीम
जयसिंगपूर : नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात महत्त्वाचा वाटा असलेल्या मालमत्ता कर वसुलीची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. मागील थकीत ९५ लाख, तर यंदा सव्वाचार कोटी रुपये वसुलीचे टार्गेट आहे. वसुलीसाठी पालिकेने सहा पथके तयार केली असून, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर न भरल्यास महिना दोन टक्के व्याज आकारले जाणार आहे.
नगरपालिकेला मालमत्ता व दुकान भाडे यातून येणारे उत्पन्न हेच सर्वाधिक उत्पन्नाचे आर्थिक स्रोत आहेत. या वसुलीबाबत होणाऱ्या अडचणी करवसुली विभागाला डोकेदुखी बनल्या आहेत. मागील वर्षी आर्थिक वर्ष संपतानाच कोरोनामुळे वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले नाही. मालमत्ता कर वसुली घटल्यामुळे मागील थकबाकी ९५ लाख व यंदाचे टार्गेट सव्वाचार कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे मालमत्ता कर विभागाला कसरत करावी लागणार आहे. मालमत्ता व गाळे भाड्याच्या वसुलीसाठी पालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. सहा पथकामध्ये ३५ ते ४० कर्मचाऱ्यांचा समावेश करून करवसुलीचे नियोजन करण्यात आले आहे. थकबाकी व मागणीच्या तुलनेत वसुली नसेल तर पालिकेला विविध कामात अडचणीत येतात. परिणामी त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. ३१ डिसेंबरपर्यंत कर न भरल्यास जानेवारी २०२१ पासून महिना दोन टक्के व्याज आकारले जाणार असल्याची माहिती वसुली विभागाकडून देण्यात आली.