जयसिंगपूरची कन्या बनली अमेरिकेची नगरसेविका; न्यू जर्सीमधील निवडणुकीत रचला इतिहास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 14:49 IST2021-11-18T11:18:02+5:302021-11-18T14:49:01+5:30
जयसिंगपूर : अमेरिकेतील न्यूजर्सी भागात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणुकीत होपवेल टाऊनशिपमध्ये नगरसेविका म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर ...

जयसिंगपूरची कन्या बनली अमेरिकेची नगरसेविका; न्यू जर्सीमधील निवडणुकीत रचला इतिहास!
जयसिंगपूर : अमेरिकेतील न्यूजर्सी भागात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणुकीत होपवेल टाऊनशिपमध्ये नगरसेविका म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की यांचा एक हजार मतांनी पराभव केला. होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षांच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला यांना मिळाला आहे.
उर्मिला या चौथ्या गल्लीतील विजया व जनार्दन अर्जुनवाडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण जयसिंगपूरमध्ये झाले. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेतील न्यूजर्सी राज्यातील होपवेल येथे असून, त्या गेल्या २५ वर्षांपासून औषध निर्मिती कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिके आणि परिषदांमध्ये प्रसिध्द झाले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची झोनिंग व ॲडजस्टमेंट बोर्डवर सहाय्यक सदस्य म्हणून नेमणूक केली गेली. सहा वर्षांपासून टाऊनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहात आहेत. त्यामुळे त्यांना टाऊनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या निवडणुकीत यश मिळवून जयसिंगपूरचा आणि भारताचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत त्यांना ३,७०१ मते मिळाली. त्यांचा शपथविधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे.
सामाजिक कार्यात सहभाग
-उर्मिला यांनी न्यूजर्सी येथे महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती, परंपरा व मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी शाळा व संस्कार वर्गाची सुरुवात केली.
-तसेच त्यांच्याकडे गणपती उत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
-गर्ल स्काऊट्स - लीडर, पालक - शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पँट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो.