जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:52+5:302020-12-05T04:55:52+5:30
यड्राव : येथील आप्पासाहेब भोसले यांना अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. ...

जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या
यड्राव : येथील आप्पासाहेब भोसले यांना अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. भोसले यांनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. माधवराव हिवाळे, रत्नप्रभा पारखी, डॉ. एस. एन. सुतार, डॉ. साक्षी सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
-----------
औरवाडमध्ये विद्युत दिवे बसविले
बुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथे विद्युत खांबावरील बंद पडलेले दिवे ग्रामपंचायतीने बदलून नवीन दिवे लावले. काही दिवसांपासून विद्युत दिवे बंद असल्यामुळे परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे दिवे बसविण्याची मागणी केल्यानंतर याठिकाणी दिवे बसविण्यात आले.
-----------
बुबनाळ-आलास मार्गावरील वाहतूक धोकादायक
बुबनाळ : बुबनाळ-आलास मार्गावरील ओढ्यावरच्या पुलालगत रस्त्याचा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे जि. प. सदस्य परवीन पटेल, पं. स. सदस्या रूपाली मगदूम यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
---------------------
कवठेसार-दानोळी रस्त्यावरील झाडेझुडपे हटवा
दानोळी : कवठेसार-दानोळी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील साईड पट्टीवर झाडाझुडपांचे मोठे साम्राज्य वाढले आहे. अनेक ठिकाणी वळणावर अशी झाडेझुडपे वाढल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. हा रस्ता अरुंद असून त्यातच ऊस वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टीवरील झाडेझुडपे हटवावीत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
-------------
रुचिता पाटीलचे यश
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील रुचिता भरत पाटील ही एमएचटीसीईटी स्पर्धा परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. ती पुणे येथील केंद्रीय विद्यालयात शिकत होती. मात्र, कोरोना महामारीमुळे घरीच राहून अभ्यास करून तिने हे यश संपादन केले आहे. तिला वडील भरत पाटील, आई रंजना पाटील यांचे मार्गदर्शन, तर आजोबा रघुनाथ पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
फोटो - ०३१२२०२०-जेएवाय-०२-रुचिता पाटील
-------------