इतुके अनर्थ एका डॉल्बीने केले...

By Admin | Updated: May 28, 2015 01:01 IST2015-05-28T00:44:18+5:302015-05-28T01:01:14+5:30

कृत्रिम भूकंप : ग्रामीण भागात वाढती क्रेझ अनेक अर्थांनी न परवडणारी

It's a disaster by a dolby ... | इतुके अनर्थ एका डॉल्बीने केले...

इतुके अनर्थ एका डॉल्बीने केले...

सातारा : डॉल्बीच्या हादऱ्यांमुळे साताऱ्यात भिंत कोसळून गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीला तीन जणांचा मृत्यू झाला. ‘घटनेवेळी तिथे डॉल्बी नव्हतीच.’ अशा विधानापासून ‘इमारतच कमकुवत होती,’ अशी सारवासारव करेपर्यंत अनेकांची मजल गेली. मात्र, खेड्यांची रचना, जीवनशैली, समाजजीवन विचारात घेता डॉल्बीचा कृत्रिम भूकंप अनेक अर्थांनी न परवडणारा आहे.
डॉल्बीबंदीचा निर्णय अनेक गावांमध्ये यापूर्वीच झाला आहे. भुर्इंजमध्ये तो झाल्यानंतर अधिकाधिक गावांनी तसा निर्णय घ्यावा, यासाठी पुढाकार घेण्यात ‘लोकमत’ची विशिष्ट भूमिका आहे. सामान्यत: लग्नाच्या वराती, सार्वजनिक उत्सव आणि अन्य कार्यक्रमांचा डॉल्बी हा अविभाज्य भाग बनू पाहत आहे.
डॉल्बीच्या हादऱ्यांमुळे शारीरिक दुष्परिणाम; इतकेच नव्हे तर मृत्यूही झाले आहेत. तथापि, दुष्परिणाम होण्याची प्रक्रिया दीर्घकालीन आणि मृत्यू होण्याच्या घटना अत्यल्प असल्याने डॉल्बीने ठाण मांडले आहे.
तथापि, डॉल्बीचे काही तातडीचे दुष्परिणाम अगदी उघडपणे दिसू लागले असून, शांत जीवनशैली असलेल्या खेडेगावांमध्ये डॉल्बीबरोबरच एका घातक संस्कृतीने शिरकाव केला आहे.
डॉल्बीचा अट्टहास, तिच्या सुपारीसाठी वर्गणीच्या नावाने ‘खंडणी’, इतका वेळ ‘नुसतंच’ कसं नाचायचं म्हणून अपरिहार्यपणे आलेली दारू, त्यासाठी पैसे, पैशांसाठी आडमार्ग, नाचण्यावरून भांडणे, मारामाऱ्या, त्यातून कायमचे शत्रुत्व आणि कधी-कधी डबेवाडी-बोगदा रस्त्यावर घडली तशी खुनाची घटना यापैकी कोणतीही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. म्हणूनच
समंजस गावे डॉल्बीमुक्तीच्या
वाटेवर चालू लागली आहेत. (प्रतिनिधी)



पाळीव जनावरांवरही परिणाम...
सातारा शहरात गेल्या वर्षी गणेश विसर्जन सोहळ्यात कोसळलेल्या भिंतीखाली तिघेजण गाडले गेल्यानंतर इमारत तकलादू होती हे सांगण्याची अहमहमिका लागली. खेड्यात काँक्रिटीकरण मुळातच कमी असते. बहुतांश घरे जुनी, मातीची, कौलारू असतात. असे एखादे घर डॉल्बीमुळे कोसळले आणि ते तकलादू होते असा युक्तिवाद केला गेला, तर संबंधिताला दाद मागणेही अवघड होऊ शकते. शिवाय, गोठ्यातील पशुधन, शेतीसाठी उपयुक्त पशुपक्षी आणि एकंदर निसर्गावरील परिणाम अद्याप गृहीतही धरले गेलेले नाहीत. ते भयावह
आहेत.


गावागावांत वाढला संघर्ष...
डॉल्बीच्या कंपनांमुळे आंतरिक ऊर्मी उचंबळून येतात. रक्तदाब नेहमीपेक्षा जास्त राहतो. त्यातच पूर्ववैमनस्य असलेली व्यक्ती समोर आली की बोलाचाली, शिवीगाळ होते. डॉल्बीच्या धुंदीत दारूची नशा मिसळलेली असली की भांडणाची तीव्रता वाढून मारामारी होते. डॉल्बीसमोर नाचण्यावरून मारामारी झाल्याच्या असंख्य फिर्यादी विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. गावात गट-तटांबरोबरच बांधावरून असलेल्या वैमनस्याची संख्या शहरापेक्षा अधिक असते. दारू आणि डॉल्बीमुळे संघर्षाची तीव्रता वाढल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

Web Title: It's a disaster by a dolby ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.