कोल्हापूर : पुरुषांच्या फॅशन शोमध्ये दर्शविलेल्या चपला या पारंपरिक भारतीय हस्तनिर्मित आहेत. ज्याचा शतकांपूर्वीचा वारसा आहे. आम्ही अशा भारतीय हस्तकलेचे सांस्कृतिक महत्त्व कायम मानतो, या शब्दांत आपली चूक कबूल करत इटालिएन प्राडा कंपनीने कोल्हापुरी चप्पलबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्सशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले. तसे पत्र ‘प्राडा’ने कोल्हापूर चेंबरला पाठवले आहे.‘प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केल्याने कोल्हापुरातील चर्मकाऱ्यांवर अन्यायाची भावना निर्माण झाली होती. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर चेंबरकडे आपले गाऱ्हाणे मांडले. कोल्हापूर चेंबरने त्वरित ‘प्राडा’ला याप्रश्नी पत्रव्यवहार करून चूक दुरुस्त करण्याची सूचना केली. यावर ‘प्राडा’ने कोल्हापूर चेंबरला पत्रव्यवहार करून चूक दुरुस्त केल्याचे कळवले. आम्ही याबाबतीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरच्या संपर्कात आहोत आणि आम्हाला तुमच्यासमवेत एकत्रित चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यास आनंद होईल. प्राडा टीमसह पुढील चर्चा आयोजित करू, असे या समूहाचे संयुक्त सामाजिक जबाबदारीचे प्रमुख लोरेंझो बर्टेली यांनी कोल्हापूर चेंबरला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
Kolhapuri chappal: ‘प्राडा’ कोल्हापूर चेंबर्सशी साधणार चप्पलबाबत संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:21 IST