ऊसतोडीला शिस्त लावणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:50+5:302021-01-13T04:59:50+5:30
लोगो: खुशाली की खंडणी कोल्हापूर : ऊसतोडीच्या त्रासाला कंटाळून उद्या शेतकऱ्यांनी ऊस लावणेच बंद केले तर जिल्ह्यातील साखर उद्योगाला ...

ऊसतोडीला शिस्त लावणे काळाची गरज
लोगो: खुशाली की खंडणी
कोल्हापूर : ऊसतोडीच्या त्रासाला कंटाळून उद्या शेतकऱ्यांनी ऊस लावणेच बंद केले तर जिल्ह्यातील साखर उद्योगाला ते परवडणारे नाही. ‘लोकमत’ने गेली ४ दिवस ऊसतोडीच्या माध्यमातून तयार होऊ पाहणाऱ्या खंडणी बहाद्दरांवर प्रहार केला. यावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत साखर कारखानादारांनीच याला शिस्त लावावी, असे ठाम मत व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडक साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी या विषयावरील दिलेल्या प्रतिक्रिया देत आहोत.
...............
ऊसताेड मजूर कमी येणे, हे एक कारणही या प्रकाराला हातभार लावत आहे. टोळ्या न येण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यासाठी शासनाने ऊसतोड मजूर महामंडळ तयार करावे. राज्यातील सर्व मजुरांची तेथे नोंदणी करावी. ज्या कारखान्यांना मजूर लागतील त्यांनी महामंडळाकडून पैसे भरून मजूर घेऊन जावे. यामुळे यातील गैरप्रकाराला आळा बसेल. शेतकऱ्यांनीही ऊसतोडीसाठी गडबड करू नये. शिस्त लावण्यासाठी कारखानदारांनीही पुढाकार घ्यायचा असेल तर आमची तयारी आहे.
-के.पी. पाटील, अध्यक्ष, दुधगंगा वेदगंगा साखर कारखाना, बिद्री
.....................
ऊसतोडीसाठी कुठे पैसे घेतले असतील तर माझ्याकडे लेखी तक्रार करा. मी त्या टॅक्टरवाल्याच्या वाहतूक बिलातून पैसे कट करून संबंधित शेतकऱ्याला देतो, असे आवाहन केले आहे; परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याने तक्रार दिलेली नाही. शेतकऱ्यांनी ठाम राहून तोडीसाठी मागे लागणे बंद केले पाहिजे. आम्ही हस्तक्षेप केला तर टॅक्टरवाला दुसऱ्या दिवशीपासून इतर कारखान्याकडे ऊस नेण्यास सुरुवात करतो. यासाठी शेतकऱ्यांनीच आता पैसे देणार नाही, अशी भूमिका घ्यावी.
-सर्जेराव माने, अध्यक्ष, राजाराम सहकारी साखर कारखाना, क. बावडा
.....................
शेतकरी संघटनांची ठाम भूमिका व साखर कारखानदारांची शिस्त यामुळे शिरोळ तालुक्यात तरी तोडीसाठी पैसे घेण्याचे प्रकार कमी आहेत; परंतु इतर भागात अशा प्रकाराचा अतिरेक झाला आहे. आमच्याकडे क्रमपाळीनुसारच तोडणी होते व यात संचालकसुद्धा हस्तक्षेप करत नाहीत. असले प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठवावा, त्यासाठी संचालकांनी पुढाकार घ्यावा. यामध्ये शिस्त आणण्यासाठी काही मदत लागली तर गुरुदत्त शुगर्स कायम तयार असेल.
-माधवराव घाटगे, प्रमुख गुरुदत्त शुगर्स, सैनिक टाकळी.
........................
आमच्या कारखान्यात क्रम पाळीपत्रकानुसारच तोडणी होते; परंतु कारखानदारांच्या स्पर्धेमुळे यंदा कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्याकडे ८० टक्के तोडणी मजूर हे भागातीलच आहेत. त्यांना काही दिवस गावात तर काही दिवस भागात ऊस तोड करावी लागते; परंतु इतर कारखान्यांनी त्यांना कुठूनही आणा; पण ऊस पुरवा, असे सांगितल्याने आमच्याकडील अनेक टोळ्या कमी झाल्या आहेत. आम्हाला अमुक एका कारखान्याकडे गावातच तोडणी मिळणार असेल, तर तुमच्याकडे कशाला येऊ, असा त्यांचा सवाल आहे. यातूनच पैसे घेऊन मनमानीपणे तोडीचे प्रकार सुरू आहेत. याला शिस्त लावणे काळाची गरज आहे.
-चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी कासारी साखर कारखाना, कुडित्रे.
......................
आम्ही कारखान्यावर अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे की, करार केलेले वगळता इतर टॅक्टर आमच्याकडे ऊस उतरूच शकत नाहीत. यंदा मजूर कमी आल्याने भीतीपोटी शेतकरी पैसे देऊन ऊस तोड घेत आहे; परंतु हे सर्व प्रकार आमच्या अपरोक्ष सुरू आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी तोडीसाठी गडबड करू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असून शिस्त लावण्यासाठी काही निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करू.
-श्रीधर गोसावी, जनरल मॅनेजर, डालमिया शुगर्स, आसुर्ले, पोर्ले
.........................
‘लाेकमत’ची भूमिका...
खुशाली नव्हे, खंडणी ही मालिका आम्ही मांडली. यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मांडल्या. जिल्ह्यात सर्व पातळीवर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना साखर कारखानदार, लाेकप्रतिनिधी, प्रशासन गांधारीची भूमिका घेऊन स्वस्थ कसे काय बसू शकतात, असा सवालही उपस्थित झाला. या ज्वलंत विषयावर मार्ग काढत शेतकऱ्यांची गळचेपी थांबावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व कारखानदार, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी यांची सर्वसमावेशक बैठक घ्यावी व यातून ऊसतोडीवर कुणाचे तरी नियत्रंण राहील, यासाठी कार्यक्रम तयार करावा. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी ससेहोलपट होणे बरे नाही. यात लोकमत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांबरोबर असेल.
(समाप्त)