कोल्हापुरात आजचा दिवसही पावसाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:00+5:302021-01-08T05:23:00+5:30

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात मुक्काम ठोकलेल्या अवकाळी पावसाचा आजचा शुक्रवारचा दिवसही पावसाचाच असणार आहे. उद्या शनिवारपासून वातावरण ...

It is still raining in Kolhapur today | कोल्हापुरात आजचा दिवसही पावसाचाच

कोल्हापुरात आजचा दिवसही पावसाचाच

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात मुक्काम ठोकलेल्या अवकाळी पावसाचा आजचा शुक्रवारचा दिवसही पावसाचाच असणार आहे. उद्या शनिवारपासून वातावरण पूर्वपदावर येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, गळीत हंगामावर अवकाळीची अवकृपा झाली असून, शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडी खोळंबल्या आहेत. आधीच मजूर टंचाईमुळे तोडणी वेळापत्रक विस्कटले असताना, आता पावसाने घातलेल्या धिंगाण्याने ऊस उत्पादक, तोडणी मजुरांसह कारखाना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्र ते उत्तर मध्य महाराष्ट्रात कमीदाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार नाही, पण ढगांच्या गडगडाटासह येणाऱ्या बेमोसमी पावसाने जानेवारी महिन्यातील शेतीसह ऊसतोडणी, वीजभट्टी, गुऱ्हाळे आदी हंगामांवर पाणी फिरवले आहे. हे सगळे हंगाम ऐन जोरात असताना अवकाळीने मोठा ब्रेक लावला आहे.

बुधवारी सायंकाळपासू्च पावसाला सुरुवात झाली होती. थांबून थांबून सरी कोसळत राहिल्या. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत पावसाचे थेंब पडतच होते. दिवसभर ढगाळ वातावरण आणि तीननंतर काहीसे सूर्यदर्शन झाले, तरी वातावरण कुंदच राहिले. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कायम राहणार असल्याने आज शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारपासून वातावरण निवळेल, असाही अंदाज आहे.

चौकट ०१

फवारणीचा खर्च वाढणार

हा पाऊस हरभरा, कांदा, लसूण, गव्हासह वेलवर्गीय पिके व भाजीपाल्यासाठी कर्दनकाळ बनून आला आहे. मोठ्याप्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन पडला आहे. ऊसतोडी झालेल्या ठिकाणी बुडक्यावर बुरशी वेगाने वाढणार असल्याने त्याच्याही औषध-पाण्याचा खर्च वाढला आहे.

चौकट ०२

फळांची गळ वाढली

आता आंब्यासह फळवर्गीय पिके मोठ्याप्रमाणावर फुलोऱ्यावर होती. मोहर चांगला आल्याने फळे दिसू लागली होती, पण या पावसाने मोहर गळण्यासह छोटी-छोटी फळेही गळून पडू लागली आहेत. नारळ, फणस, लिंबूचीही फूल व फळ गळ वाढली आहे.

Web Title: It is still raining in Kolhapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.