मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट :चंद्रकांत पाटील यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:06 IST2020-07-27T17:40:13+5:302020-07-27T18:06:10+5:30
मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट :चंद्रकांत पाटील यांचा आरोप
कोल्हापूर : सरकारने आपल्याला मराठा आरक्षणप्रश्नी पुरेशी माहिती दिलेली नाही असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करणे धक्कादायक असून या प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रश्नी आता १ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.
ते म्हणाले, आम्ही सुरूवातीपासून सांगत होतो की हे प्रकरण गांर्भियाने घ्या. महाराष्ट्रातील ३२ टक्के समाजाचा हा प्रश्न आहे. तेव्हा दोनच दिवसांपुर्वी शनिवारी सरकारने आमची पूर्वतयारी झाल्याचे सांगितले होते. मग सर्वोच्च न्यायालयात पुरेशी माहिती मिळालेली नाही आणि व्हर्च्युअल सुनावणी शक्य नाही असे सांगून सरकारच्या वकिलांनी पुढची तारीख वाढवून का मागितली असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे आता कोणतीही नोकरभरती करताना मराठा आरक्षण गृहित धरून भरती करता येणार नाही. यामुळे मराठा तरूण तरूणींची झोप उडाली आहे.
अड. प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हांला इगतपुरीला विपश्यनेला जाण्याचा सल्ला दिला आहे याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ते डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांच्याबद्दल आम्हांला आदर आहे. त्यांनी आपुलकीनेच सल्ला दिला आहे. मी विचार करेन.
एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, राममंदिर हा जगभरातील हिंदूच्या आस्थेचा विषय आहे. शिवसेनेने याबाबत काहीही न करता यात आपला मोठा वाटा असल्याचा दावा केला. तीन कोटी भाविकांनी या कार्यक्रमाला जावू नये हे मान्य. पण निवडक ३०० जणांना बोलावण्यात आले आहे.
मुस्लीम व्होट बँकेची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादीसोबत सत्ता राबवायची असल्याने अयोध्येला जायचे की नाही असा पेच उध्दव ठाकरे यांच्यासमोर आहे. त्यांना हिंदूत्वापेक्षा खूर्ची महत्वाची आहे. वाढदिवसासाठी तसेच राष्ट्रीय पातळीवरील कार्यासाठीही त्यांना शुभेच्छा आहेत.