सिंचन झाले, पीक कुठे आहे? : वायकर
By Admin | Updated: February 23, 2015 23:55 IST2015-02-23T23:51:41+5:302015-02-23T23:55:44+5:30
पाहणी करून संबंधितांवर करणार कारवाई

सिंचन झाले, पीक कुठे आहे? : वायकर
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक धरणप्रकल्पांच्या माध्यमातून ४१६१ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असेल, तर त्यात पीक का आले नाही? असा सवाल करीत या सिंचनाखालील क्षेत्राची स्वत: पाहणी करणार आहे. त्यात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. गडनदीसारख्या अनेक धरणप्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात जमिनी सिंचनाखाली आल्याचे सांगितले जाते. जर हे खरे असेल तर त्या क्षेत्रात पीकरूपाने उत्पादन का झाले नाही? या सर्वच क्षेत्राची पाहणी केल्यानंतर दोषींंना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. १६२ किलोमीटर्स सागरी किनारपट्टीवर वॉटर स्पोर्टची सुविधाही निर्माण केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
‘आंबा महोत्सव’ होणार
रत्नागिरीत होणारा ‘आंबा महोत्सव’ गेल्या काही वर्षांत बंद पडला होता. यंदा हा महोत्सव रत्नागिरीत होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. कोकणातील उत्पादनांना या महोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पर्यटक मोठ्या संख्येने येणे, हा यामागे उद्देश आहे.