तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेशन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:24 IST2020-12-22T04:24:02+5:302020-12-22T04:24:02+5:30
हुपरी : राज्यातील काही ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, तत्कालीन ग्रामपंचायतकालीन सर्व ...

तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेशन करा
हुपरी : राज्यातील काही ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, तत्कालीन ग्रामपंचायतकालीन सर्व कर्मचाऱ्यांचे अद्यापही समावेशन झालेले नाही. शासनाने तत्कालीन ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या व अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात, अन्यथा या मागण्या मान्य करण्यासाठी आता आर या पार लढाई करून सरकारला जागे करावे लागेल. जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन होणार नाही, तोपर्यंत डोक्यावर फेटा घालणार नाही, अशी शपथ महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष अनिल पवार यांनी घेतली.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना पुणे विभाग व कोकण विभाग यांचा संयुक्त मेळावा व संघटनेच्या हुपरी (ता. हातकणंगले) शाखेचा नामफलक उद्घाटन सोहळा समारंभात ते बोलत होते. मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे यांच्या हस्ते नामफलक अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष सुभाष मोरे होते. महाराष्ट्र राज्यातील काही ग्रामपंचायतीचे नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले; मात्र तत्कालीन ग्रामपंचायतकालीन सर्व कर्मचाऱ्यां अद्यापही समावेशन झालेले नाही. शासनाने विनाअट सर्व तत्कालीन ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांचे नगरपरिषदेमध्ये समावेशन करावे, सुधारित आकृतिबंध तयार करण्यात यावा. सेवेतील मृत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ सेवेत सामावून घेऊन त्यांची देणी देण्यात यावीत, समावेशन नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे अशा मागण्या मांडल्या.
मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे म्हणाल्या, हुपरी नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन एक वर्षापूर्वीपासून लागू केलेले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्यांच्या मागणीप्रमाणे यापूर्वीच देण्यात आलेली आहेत. नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या शासन नक्की मंजूर करेल. याकरिता आपले प्रयत्नही सुरू ठेवा, नक्कीच यश मिळेल. अशी ग्वाही दिली.
जिल्हाध्यक्ष अभिजित गोरे, राज्य सचिव विजय भोंडवे, राज्य उपाध्यक्ष सुभाष मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूर्यकांत खोत यांनी सूत्रसंचालन केले. मिरासो शिंगे यांनी प्रास्ताविक केले. जाणबा कांबळे व तात्यासो यादव यांनी स्वागत केले. विनोद कांबळे यांनी आभार मानले.
----
फोटो ओळी - हुपरी (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना पुणे विभाग व कोकण विभाग यांच्या संयुक्त मेळाव्यात हुपरीच्या मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे यांचा सत्कार संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आला.