दत्तवाड : शिरोळ तालुक्यामधील दत्तवाड गाव आणि परिसरामध्ये बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दत्तवाड येथील हिंमतराव खराडे यांच्या फार्म हाऊससमोर वन्य प्राण्याचे ठसे आढळल्याचे निदर्शनास आले आहे. एकूणच या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करावी व वन्य प्राण्याचा शोध घ्यावा, असे आदेश आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हातकणंगले विभागाचे वनपाल घनशाम भोसले यांना दिले आहेत.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता रेळेकर यांच्या घराजवळ असणाऱ्या रोपवाटिकेत बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे सौरभ रेळेकर याने आपल्या कॅमेऱ्यात त्या प्राण्याचे छायाचित्र काढले आहे. दरम्यान, वनविभागाकडून पंधरा कर्मचाऱ्यांचे पथक रविवारी दत्तवाड परिसरात झाले आहे. वनविभागामार्फत वन्यप्राण्याच्या शोधासाठी परिसरात दोन दिवस थांबून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. पथकामध्ये वनपाल, वनरक्षक, डॉक्टर, वनमजूर यांच्यासह डॉ. संतोष वाघवेकर तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून स्थानिक सर्पमित्रांची या कामी मदत घेणार असल्याची माहिती वनपाल भोसले यांनी दिली आहे.