‘कृष्णा नळपाणी’ची चौकशी करा
By Admin | Updated: June 7, 2014 01:04 IST2014-06-07T01:01:45+5:302014-06-07T01:04:34+5:30
इचलकरंजीतील नागरिकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

‘कृष्णा नळपाणी’ची चौकशी करा
कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी राबविण्यात आलेल्या कृ ष्णा नळपाणी पुरवठा योजनेला वारंवार गळती लागून कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून या योजनेच्या कामाची चौकशी करावी तसेच पंचगंगा नदी सतत प्रवाहित ठेवण्यात यावी, नागरिकांना पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन आज घर कामगार मोलकरीण सखी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचे चिटणीस डी. आर. सावंत यांनी हे निवेदन स्वीकारले.
इचलकरंजी नगरपालिकेने शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा व
कृ ष्णा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने तेथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. कृष्णा योजनेच्या पाईपला गळती लागल्याने सहा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गळती सुरू झाली आहे. जीवन प्राधिकरणाने केलेल्या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्यामुळे जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. म्हणूनच या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. इचलकरंजीकरिता पाणीपुरवठा सुधारण्याकरिता हस्तक्षेप करून इचलकरंजीतील नागरिकांची पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्तता करावी, अशाही मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील चिटणीसांना भेटलेल्या शिष्टमंडळात रघुनाथ कांबळे, आनंदा गुरव, छाया नाईक, वैशाली कांबळे, जयश्री घाटगे, कमल पारीख, संपत कांबळे, अभिमन्यू चव्हाण, आदींचा समावेश होता.