कृषी अवजारांच्या घोटाळ्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST2021-03-31T04:23:59+5:302021-03-31T04:23:59+5:30
जयसिंगपूर : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करावी आणि दोषी ...

कृषी अवजारांच्या घोटाळ्याची चौकशी करा
जयसिंगपूर : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली.
राज्य शासनाने विकत घेतलेली सुमारे ८५ हजार अवजारे राज्यातील कृषी अधीक्षकांनी संबंधित शेतकऱ्यांना वाटलेली नाहीत. या अवजारांमध्ये एचडीपीई पाइप, सिंचन पंप, मळणी यंत्र, स्वयंचलित यंत्र, पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे आदी अवजारांचा समावेश आहे. राज्यातील अत्यल्प भूधारक, आदिवासी तसेच मागासवर्गीय व साधारण गटातील शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी अवजारे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी जिल्हानिहाय अनुदानदेखील दिले आहे. मात्र, काही जिल्ह्यांतील ठेकेदारांनी कृषी विभागाच्या ताब्यात दिली. मात्र, ती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. त्यामुळे कृषी अवजारांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झालेली आहे. तीन वर्षांपासून अवजारे गंजून पडलेली आहेत. ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात सावळा गोंधळ तसेच बोगसगिरी उघड झालेली आहे. तसेच ही अवजारे शेतकऱ्यांसाठी होती की, अधिकारी तसेच ठेकेदारांना पोसण्यासाठी होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस बिले घेऊन अनुदान लाटल्याचे धक्कादायक प्रकार अनेक जिल्ह्यांत घडलेले आहेत. काही प्रकरणांत अवजारे चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. अशा बाबी धक्कादायक असून राज्य शासनाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून सखोल तपासणी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
फोटो - ३००३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - मुंबई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन दिले.