अमन मित्तल, लोहार, युवराज बिल्ले यांची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 01:50 PM2023-12-15T13:50:28+5:302023-12-15T13:51:02+5:30

कोरोना काळातील खरेदी घोटाळा प्रकरणातील तक्रारींची शहानिशा करा: आरोग्य सहसंचालकांचे पत्र

Interrogate Aman Mittal, Nitin Lohar and Yuvraj Bille regarding the complaint in the Corona corruption case | अमन मित्तल, लोहार, युवराज बिल्ले यांची चौकशी होणार

अमन मित्तल, लोहार, युवराज बिल्ले यांची चौकशी होणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तत्कालिन जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार आणि औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांची कोरोनातील भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारीबाबत चौकशी करावी, असे पत्र आरोग्य सहसंचालकांनी काढले आहे. त्याला अनुसरून आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांना पत्र काढले असून त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाची लागण सुरू झाल्यानंतर लगेचच मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायजरची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. तातडीने गरज असल्याने जेथून मिळेल तेथून, मिळेल त्या दराने हे साहित्य घेण्यात आले. अशातच तत्कालिन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खरेदीची सर्व जबाबदारी तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर सोपवली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. हळूहळू कोरोनाचे रूग्ण वाढू लागले. त्याबरोबरची खरेदीचे आकडेही वाढू लागले.

विविध नेत्यांच्या कारखान्यांना, नातेवाईकांना जादा किमतीची कंत्राटे कशी मिळाली अशी विचारणा करत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली. सध्याचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आघाडीवर होते. यातूनच मग तक्रारी झाल्या. अशाच एका तक्रारीची दखल घेत आरोग्य सहसंचालकांनी चौकशी करण्याबाबत पत्र पाठवले असून यामध्ये वरील तीनही नावांचा उल्लेख केला आहे. जुलैमध्ये पहिले पत्र आले असून सप्टेंबरमध्ये आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत पत्र काढले आहे.

नेत्यांचे फोन सुरू

हे चौकशीचे पत्र आल्यानंतर लगेचच सर्वपक्षीय नेत्यांचे फोन सुरू झाल्याचे समजते. कारण त्या काळामध्ये यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही याबाबत निवेदने देण्यात आली होती. तक्रारीनंतर दोन वर्षांनी पुन्हा चौकशी सुरू झाल्याने नेत्यांनाही यामागे नेमके कोण आहे हे समजेना झाले आहे.

चौकशी करायची कुणाची?

मित्तल हे आयएएस अधिकारी असल्याने त्यांची चौकशी जिल्हा परिषद पातळीवर करता येत नाही. नितीन लोहार यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करता येत नाही. राहता राहिले बिल्ले. त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Interrogate Aman Mittal, Nitin Lohar and Yuvraj Bille regarding the complaint in the Corona corruption case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.