थकीत एफआरपीवरील व्याज वसूल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:05+5:302021-07-04T04:17:05+5:30
कोल्हापूर : सहकारमंत्र्यांनी पंधरा टक्के व्याज वसुलीला दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज ...

थकीत एफआरपीवरील व्याज वसूल होणार
कोल्हापूर : सहकारमंत्र्यांनी पंधरा टक्के व्याज वसुलीला दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज आता वसूल होणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ३९ साखर कारखान्यांकडून शंभर कोटी रुपये व्याज वसूल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिली. सन २०१९ या वर्षात थकविण्यात आलेली एफआरपीवरील पंधरा टक्केप्रमाणे व्याज आकारणी करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, यासाठी आंदोलन अंकुश, जय शिवराय किसान संघटना व बळीराजा शेतकरी संघटना यांनी लढा उभारला होता.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३९ साखर कारखान्यांविरोधात हा लढा होता. याप्रश्नी साखर आयुक्तांकडे याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यांच्या जप्तीचे आदेश देण्यात आले होते. तत्कालीन सहकारमंत्री यांच्याकडे कारखानदारांनी अपील करून आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती मिळविली होती. त्यामुळे जप्तीच्या कारवाई थांबल्या होत्या. एफआरपीवरील व्याजप्रश्नी आंदोलन अंकुशने शिरोळमध्ये आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. या प्रकरणावर मुंबई येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात नुकतीच सुनावणी झाली होती. त्याबाबत शनिवारी सहकारमंत्र्यांनी कार्यवाही करीत कारखानदारांच्या अपिलावर दिलेली स्थगिती उठविली असल्याची माहिती चुडमुंगे यांनी दिली.
-
कोट - सहकारमंत्र्यांनी स्थगिती उठविल्यामुळे व्याजाचा लढा आम्ही जिंकला आहे. कारखान्यांकडून व्याजाची रक्कम जप्ती करुन वसूल होणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना आता नोटीस काढून वसुली करावी लागणार आहे.
- धनाजी चुडमुंगे, शिरोळ