गडहिंग्लज :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गडहिंग्लज उपविभागात मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊन रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे विभागातील दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावामध्ये संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था करा, अशी सूचना गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिले आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुकास्तरावरील कोविड काळजी केंद्रात सर्व रुग्णांना सामावून घेणे शक्य होत नाही. गावपातळीवरील लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत होते; परंतु त्यावर नियंत्रण नसल्यामुळे घरातील व्यक्ती बाहेर फिरून संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात ५ पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गावात बाधितांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गावातील शाळेत संस्थात्मक अलगीकरणाची उभारणी करण्यात यावी. त्याठिकाणी दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आशांची नेमणूक करावी. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. तसेच नाममात्र शुल्क आकारून वैद्यकीय सुविधा देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टर्स यांच्याशी चर्चा करावी.
अलगीकरणगृहात एका खोलीमध्ये चार व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था असेल. गर्भवती महिलांसाठी वैद्यकीय सल्यानुसार गृहविलगीकरणाचा निर्णय घ्यावा. अलगीकरणातील व्यक्तींची दररोज नोंद ठेवण्यात यावी. रुग्णाला देण्यात येणारे जेवण, चहा-नाश्तासाठी खर्च रुग्णाकडूनच घ्यावा.
याबाबत गडहिंग्लज व चंदगडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकिय अधीक्षक व ग्रामस्तरावरील समन्वय अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.