संस्थानकालीन इमारती पाडण्याचा घाट
By Admin | Updated: July 9, 2015 00:24 IST2015-07-09T00:24:54+5:302015-07-09T00:24:54+5:30
इचलकरंजीतील प्रकार : आदी व्यंकटराव, शाळा क्रमांक दोन, सिटी सर्व्हे कार्यालय इमारतींचा समावेश

संस्थानकालीन इमारती पाडण्याचा घाट
इचलकरंजी : शहरातील संस्थानकालीन शाळांच्या इमारती पाडून त्याठिकाणी व्यापारी संकूल उभारण्याचा घाट घातला जात आहे. गद्रे दत्तमंदिरालगतची अशी सुस्थितीतील शाळेची इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्याचा सुमारे दहा लाख रुपयांचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवर ठेवण्यात आला आहे. यापाठोपाठ आता आदी व्यंकटराव व शाळा क्रमांक दोन आणि ऐतिहासिक नगरपालिकेच्या जुन्या इमारतीचा समावेश आहे. इचलकरंजीचे दूरदृष्टीचे जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा पाया सुमारे शंभर वर्षांपूर्वी रचला. त्यांनी गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी त्यावेळी राजवाड्यासमोर ‘आदी व्यंकटराव’ ही शाळा व सरकारी तालीम बांधली. तर गावभागामध्ये अनुबाई कन्या शाळा ही स्त्री शिक्षणाची सोय असलेली फक्त मुलींसाठी शाळा सुरू केली. श्रीमंत घोरपडे यांच्याच दूरदृष्टीने नगरपालिका सुरू झाली. त्यावेळी नगरपालिकेची (म्हणजे सध्याचे सिटी सर्व्हे आॅफिस) इमारत बांधून तेथे पालिकेचा कारभार सुरू केला. अशा प्रकारे संस्थानकालीन इमारती पाडून तेथे आता व्यापारी संकुलाच्या उभारणीचा बेत नगरपालिका करीत आहे. त्याचीच नांदी म्हणून गद्रे दत्तमंदिरालगत सध्या पद्मावती विद्यामंदिर असलेल्या ठिकाणची दगडी व उत्तम लाकडी असलेली इमारत पाडण्याचे आणि त्या जागी नवीन इमारत बांधण्याचे साधारणत: दहा लाख रुपयांचे इस्टिमेट नगरपालिकेने केले आहे. हा विषय ९ जुलैच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवर आणला आहे. आदी व्यंकटराव विद्यामंदिर, शाळा क्रमांक दोन, जुनी नगरपालिका (सिटी सर्व्हे आॅफिस) किंवा गद्रे दत्तमंदिरालगतची इमारत अशा संस्थानकालीन इमारती स्वातंत्र्यानंतर शासनाच्या मालकीच्या झाल्या. अशा इमारती पुढे नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी दिल्या. जर शासनाच्या मालकीच्या या इमारती असतील, तर नगरपालिकेला पाडता येतील का, आणि तेथे व्यापारी संकुलासारख्या इमारती बांधता येतील का, किंवा या जागांचे असलेले आरक्षण नगरपालिकेला बदलण्याचे अधिकार कोण दिले, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी) लाखोंची माया आखीव व रेखीव असे घडलेले दगड आणि जुन्या व किमती लाकडाच्या या इमारती सध्याही मजबूत आहेत. या पाडल्यानंतर त्यांचे दगड आणि जुने उत्तम प्रतीचे असलेले लाकूड विकल्यानंतर लाखो रुपयांची कमाई होणार आहे. तर नवीन इमारती बांधण्यासाठी चांगले अर्थपूर्ण नियोजन केले जाणार असल्याने या इमारती पाडल्या जात आहेत, अशीच चर्चा नगरपालिका वर्तुळात आहे. फेरलिलाव कधी पालिकेकडील उत्पन्नवाढीची बाब म्हणून सध्याच्या व्यापारी संकुलातील अनेक गाळे धुळखात आहेत. तर बहुतांशी गाळ्यांची भाडेवाढ फेरलिलावांअभावी रखडली आहे. गाळे फेरलिलाव केल्यास आणि पडून असलेल्या गाळ्यांचे लिलाव केल्यास उत्पन्न वाढेल. याशिवाय बाजार कर वसुलीचा मक्ता दिल्यास उत्पन्न वाढते. अशी वस्तुस्थिती असताना संस्थानकालीन इमारतींवर वक्रदृष्टी का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.