संस्था अवसायनात, जिल्हा बँक खोलात
By Admin | Updated: July 3, 2014 00:54 IST2014-07-03T00:47:54+5:302014-07-03T00:54:21+5:30
२७ कोटी रुपये अडकले : मोठा फटका बसण्याची शक्यता; थकबाकीदारांवर ‘१०१’ नुसार कारवाई होणार

संस्था अवसायनात, जिल्हा बँक खोलात
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २० बड्या थकबाकीदार विसर्जित संस्थांसह ६५ संस्था अवसायनात काढल्याने त्यांच्याकडे २७ कोटी रुपये अडकले आहेत. यापैकी अनेक संस्थांच्या मालमत्ता विकूनही थकबाकी भागत नसल्याने तसेच संचालकांवर कारवाई करावी तर ते सापडत नसल्याने कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
बँकेच्या संचालक मंडळांनी साखर कारखाने, प्रोसेसिंग संस्था, औद्योगिक, पतसंस्था, ग्राहक, यंत्रमाग संस्थांच्या मालमत्तेपेक्षा जास्त कर्जपुरवठा केलेला आहे. या वर्गातील १३० संस्था सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांच्याकडे बँकेचे १७० कोटींची थकबाकी अडकली आहे. या संस्थांची ऐपत न पाहता संचालक मंडळाने आपल्या राजकीय सोयीसाठी अक्षरश: खिरापतीसारखे कर्जाचे वाटप केल्याने जिल्हा बँक अडचणीत आली. या संस्थांपैकी ६५ संस्था अवसायनात काढल्या आहेत. त्यातील २० संस्था विसर्जित केल्या आहेत. अनेक संस्थांची संपूर्ण मालमत्ता विकूनही बँकेची थकबाकी पूर्ण होत नाही. त्यामध्ये तंबाखू सहकारी उद्योग समूह, डेक्कन स्पिनिंग मिल, राधानगरी स्टार्च कारखाना, भोगावती कुक्कुटपालन संस्था आदी संस्थांचा समावेश आहे.
विसर्जित संस्थांकडील थकीत रक्कम संशयित बुडित फंडातून घेता येते. पण वसुलीचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर लेखापरीक्षकांच्या शेऱ्याने व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने असे करता येते. ९७ व्या घटना दुरूस्तीनुसार संस्थांवर १०१ नुसार कारवाईची परवानगी बँकेने सहकार आयुक्तांकडे मागितल्याने वसुलीतील काही प्रमाणात अडचणी दूर होतील.