कारखान्याऐवजी ऊस रस्त्यावरच...

By Admin | Updated: November 25, 2015 00:45 IST2015-11-24T23:36:58+5:302015-11-25T00:45:35+5:30

शेतकऱ्यांना आर्थिक फटका : वाहनांमध्ये ऊस व्यवस्थित बांधला जात नसल्याचा परिणाम, अपघातालाही निमंत्रण

Instead of factories, on sugarcane road ... | कारखान्याऐवजी ऊस रस्त्यावरच...

कारखान्याऐवजी ऊस रस्त्यावरच...

तानाजी घोरपडे --हुपरी -नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, ऊसतोड मजुरांकडून विविध मार्गांनी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट, कारखान्यांकडून मिळणाऱ्या रकमेचे त्रांगडे, आदी कारणांनी चिंताग्रस्त बनलेल्या शेतकऱ्यांचा ऊस वाहनांमध्ये व्यवस्थित बांधला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर उसाच्या मोळ्या सांडत गेल्याने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. तसेच अपघातास आपोआपच आमंत्रण मिळत आहे. शेतकऱ्यांना होणार आर्थिक तोटा व रस्त्यावरील अपघात थांबविण्यासाठी कारखाना प्रशासन, शेतकरी, ऊस वाहतूकदार व
ऊसतोड मजुरांनी काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांबरोबरच कर्नाटक सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात ओढवल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे ऊसतोड मिळविण्यासाठी सर्वच शेतकरी जिवाचा आटापिटा करीत आहेत. हातापाया पडून मिळविलेली ऊसतोड पार पाडण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्या व त्यांचे चोचली पुरवीपर्यंत शेतकऱ्यांची पळताभूई होत आहे.
ऊसतोड झाल्यानंतर कारखान्याकडून मिळणाऱ्या एफ. आर. पी. चे त्रांगडे झाल्याने सर्वच शेतकरी हवालदील झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता वाहनातून ऊस रस्त्यावरती सांडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. परिणामी अपघातासही सामोरे जावे लागत आहे. ऊसतोड मजूर व वाहतूकदारांकडून वाहनांमध्ये उसाच्या मोळ्या व्यवस्थित रचल्या जात नाहीत. तसेच रोप लावून चांगले आवळले जात नाही. त्यामुळे वाहन काही अंतरावर गेल्यापासून कारखान्यापर्यंतच्या मार्गावर वाहनातून उसाच्या मोळ्याच मोळ्या रस्त्यावरती पडत जातात.
अनेकवेळा एखादे वाहनच रस्त्याच्या वळणावर पलटी होऊन वाहनातील संपूर्ण ऊसच दिवस-दिवसभर उन्हामध्ये पडू राहण्याच्या घटनाही घडत असतात.
अशा घटना कोणीही जाणिवपूर्वक करीत नाही. मात्र, ऊस वाहतुकीमध्ये बेफिकीरी केली जाते हे निश्चित आहे. निसर्गापासून, राज्यशासन, साखर कारखानदार, ऊसतोड मजुरांपर्यंतच्या अनेक अडचणींमध्ये संकटात व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे ऊस
सांडणे या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखाना व्यवस्थापन, शेतकरी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

कर्णकर्कश गाणी
ट्रॅक्टर चालक कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपावरील गाणी वाजवत जातात. तसेच रात्रीच्यावेळी त्यास इंडिकेटर किंवा रेडियम नसल्याने वाहन थांबल्याचे इतर वाहनचालकांच्या लक्षातच येत नाही. त्यातून अपघात घडतात. तसेच, रस्त्याच्या मध्येच थांबलेल्या वाहनाच्या भोवती दगडं किंवा झाडाच्या फांद्या ठेवतात; पण वाहन दुरुस्त झाल्यानंतर ते दगड किंवा फांद्या काढून दूरवर न टाकता रस्त्यावर ठेवूनच निघून जातात. रात्रीच्या अंधारात मोटारसायकल चालक त्यास धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.


गाड्यांच्या प्रखर प्रकाशामुळे अपघात
ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टरच्या प्रखर दिव्यांवर काळी पट्टी नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांना त्याचा अंदाजच येत नाही. काही वाहने दोनऐवजी केवळ एकाच दिव्याच्या उजेडात जोरात वाहने चालवितात. त्यामुळे समोरून येणारे वाहन चारचाकी आहे की दुचाकी, हे जवळ येईपर्यंत त्याचा अंदाज येत नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून ऊस रस्त्यावर पडतात. त्यावरून मोटारसायकलचे चाक घसरून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.


छोटे-मोठे अपघात
उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागे लालदिवा, रेडियम नसल्याने मोटारसायकल चालकांना त्याचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात घडत आहेत. रस्ते महामार्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह साखर कारखान्यांनी त्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

Web Title: Instead of factories, on sugarcane road ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.