इचलकरंजीत नव्याने केलेले रस्ते खुदाई केल्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:54+5:302021-01-25T04:24:54+5:30
सदरची खुदाई नगरपालिकेचे नियोजन नसल्यामुळे झाल्याची नोंद इचलकरंजी : येथील लिंबू चौक परिसरातील नवीन रस्ता खोदाईची प्रांताधिकारी डॉ. विकास ...

इचलकरंजीत नव्याने केलेले रस्ते खुदाई केल्याची पाहणी
सदरची खुदाई नगरपालिकेचे नियोजन नसल्यामुळे झाल्याची नोंद
इचलकरंजी : येथील लिंबू चौक परिसरातील नवीन रस्ता खोदाईची प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी शनिवारी पाहणी केली. सदरची खुदाई नगरपालिकेचे नियोजन नसल्यामुळे झाल्याची नोंद प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी घेतली, तर शहरात नव्याने केलेले असे अनेक रस्ते खुदाई केल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. त्यानुसार काही प्रमुख ठिकाणांची सर्वांनी एकत्रित पाहणी केली.
कोल्हापूर येथे झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार आवाडे यांनी लिंबू चौक परिसरात नव्याने केलेला रस्ता खुदाई केल्याचे सांगून पालिकेचे नियोजन नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप केला. त्यावर मुख्याधिकारी संतोष खांडेकर व नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढत एकाही रस्त्याची खुदाई केली नसल्याचे सांगितले. त्यावरून सभेमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली होती. त्यावर शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी डॉ. खरात यांना वस्तुस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली. त्यानुसार सायंकाळी आमदार आवाडे, प्रांताधिकारी डॉ. खरात, मुख्याधिकारी खांडेकर, नगरसेवक सागर चाळके, सुनील पाटील, रवींद्र लोहार, अमृत भोसले यांनी पाहणी केली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी पालिकेच्या अनागोदी कारभाराचा पाढाच वाचला. तसेच नवीन रस्ते खुदाईबरोबर फुटपाथच्या कामातही ताळमेळ नसल्याचे दाखवून दिले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.खरात यांनी पालिकेचे बांधकाम अभियंता संजय बागडे व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे यांना कामाबाबत नियोजन करून पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. शहरात १०७ कोटींच्या रस्ते कामांमध्ये नव्याने केलेल्या अनेक रस्त्याची खुदाई केली जात आहे. तेव्हा याबाबत तातडीने नियोजन करावे अन्यथा त्याचा भांडाफोड करावा लागेल, असा इशारा आमदार आवाडे यांनी दिला.
(फोटो ओळी) इचलकरंजीत नव्याने केलेले रस्ते खुदाई केल्याची शनिवारी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक सागर चाळके, सुनील पाटील, रवींद्र लोहार, अमृत भोसले उपस्थित होते.