मनमोहक ‘हुदहूद’च्या अस्तित्वावर घाला
By Admin | Updated: August 18, 2014 23:24 IST2014-08-18T22:19:04+5:302014-08-18T23:24:45+5:30
पूर्व भागातील स्थिती : शेती दुर्मिळ पक्ष्यांच्या जिवावर उठली

मनमोहक ‘हुदहूद’च्या अस्तित्वावर घाला
प्रवीण जगताप-- लिंगपूर --जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत पाहावयाला मिळणारा ‘हुदहूद’ पक्षी (ज्याला आपण माहितीअभावी सुतार पक्षी म्हणतो) आता अत्यंत दुर्मिळ झाला आहे. मागील चार-पाच वर्षांत त्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे. अणकुचीदार चोच, डोक्यावर तुरा, अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे, तपकिरी रंगांची आकर्षक रंगसंगती यामुळे मनमोहक दिसणारा ‘हुदहूद’ आता शोधूनही पहावयास मिळत नाही. घटत चाललेला गवताळ प्रदेश, वाढणारी नागरी वस्ती, कमी होणारे वनक्षेत्र, वृक्षतोड व जुन्या वृक्षांची कमी होत असलेली संख्या यामुळे या ‘हुदहूद’ पक्ष्यांचे दर्शन दुर्मिळ होत आहे.
भारतामध्ये सर्वत्र आढळणारा सुतार पक्षी सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ जत तालुक्यासह पूर्वी शहरी भागात व ग्रामीण गावांलगतही तो आढळून यायचा. अगदी सहज झाडांच्या बुंध्याखाली, गवताळ प्रदेशात व गावातही त्याचे वास्तव्य होते. पूर्वी अधून-मधून अशा परिसरात त्याचे दर्शन व्हायचे. आता मात्र ‘हुदहूद’ हा पक्षी पहावयास मिळत नाही. सध्याच्या पिढीला तर फक्त पुस्तकातील चित्रातच हे पक्षी दाखवावे लागत आहेत.
हा पक्षी आपल्या अणकुचीदार चोचीने गवताळ प्रदेशातील किडे, जमिनीतील गांडूळ, मुंग्या खातो, तर मध आणि फळांतील मगजही तो खातो. काहीवेळा बियाही खातो. मात्र सद्यस्थितीला सांगली जिल्ह्याच्या मिरज, कवठेमहांकाळ या तालुक्यातून शेतीचे वाढते क्षेत्र, गवताळ व कुरण क्षेत्रात झालेली प्रचंड घट, जुन्या झाडांची कत्तल यामुळे त्याला राहण्यास घरटे करता येत नाही. शिवाय झाडांच्या साली काढून त्याखालील वाळवी, किडे व मुंग्या खाता येतील, अशी झाडेच दिसत नाहीत. त्यांचे खाद्य व निवास या दोन्ही गरजा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच पूर्वी पडीक क्षेत्र अधिक होते. पडीक रानात पाच, सहा महिने गवत उगवलेले असायचे. येथे किड्यांचीही निर्मिती मोठी होत असे. सध्या मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व जत परिसरात फळलागवड, ऊसशेती वाढत आहे. येथे पूर्वी वनक्षेत्र व कुरणाबरोबरच पेरू, बोरे, जांभळ, गावरान सीताफळे, गावरान आंबे अशी देशी फळांची झाडेही अधिक होती. आता या फळांची जागा द्राक्षबागा, चिकूबागा, आंब्याच्या बागा, भाजीपाला व फळभाज्या यांच्या शेतीने घेतली आहे.
पक्ष्यांना उपयोगी ठरणारे गवताळ प्रदेश संपत चालले आहेत. तसेच झाडांचीही तोड सुरू आहे. पाण्याचे साठे कोरडे असतात. परिणामी त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मार्च ते आॅगस्ट हा त्यांचा वीण हंगाम असतो. मात्र त्यांची रोडावलेली संख्या, अपुरे खाद्य, निवासाची नष्ट झालेली ठिकाणे यामुळे त्यांचा वीण काळही धोक्यात असून, हे पक्षी कमी होत आहेत.
आपण समजतो तो तुरा असलेला व लांब चोच असणारा व सुमारे १२ इंच लांबी असणारा पक्षी सुतार पक्षी नसून, त्याचे खरे नाव हुदहूद (लॅटीन : हुप्पू) असे आहे. सुतार पक्षी आकाराने लहान असतो. हुदहूद हा पक्षी गवताळ व वनक्षेत्रात नदी, तलाव परिसरात पाणी असणाऱ्या ठिकाणीही पाहायला मिळतो. वाढणारी फळशेती, गवताळ क्षेत्रातील घट आणि वाढणारी नागरी वस्ती यामुळे त्यांचे सहज होणारे दर्शन आता दुर्मिळ झाले आहे. त्यांना पाहायचे असल्यास आता तशा ठिकाणांची निवड करूनच त्यांचे दर्शन शक्य आहे.
- शरद आपटे,
पक्षीतज्ज्ञ, सांगली.