१५० विद्यार्थी, २० प्राध्यापकांकडे चौकशी
By Admin | Updated: September 3, 2016 00:56 IST2016-09-03T00:54:07+5:302016-09-03T00:56:09+5:30
चौकशी समितीची कार्यवाही पूर्ण : सहसंचालकांना आज अहवाल देणार

१५० विद्यार्थी, २० प्राध्यापकांकडे चौकशी
कोल्हापूर : ‘शासकीय तंत्रनिकेतन’मधील उपप्राचार्य डॉ. ए. के. उपाध्याय यांच्याबाबत प्राप्त तक्रारींच्या चौकशीची कार्यवाही तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे नियुक्त समितीमार्फत शुक्रवारी पूर्ण झाली. समितीने तंत्रनिकेतनमधील १५० विद्यार्थी, २० प्राध्यापक आणि वसतिगृहातील रेक्टर, लिपिक, आदींकडे चौकशी केली. या चौकशीचा अहवाल तंत्रशिक्षणच्या पुणे विभागीय सहसंचालकांना आज, शनिवारी समिती सादर करणार आहे.
कऱ्हाडच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल, अधिव्याख्याता आर. एस. पाटील, एस. बी. पाटील, एस. एम. साळवी यांचा समावेश असलेली समिती गुरुवारी तंत्रनिकेतनमध्ये दाखल झाली. या समितीने शुक्रवारी दिवसभर विविध घटकांशी संवाद साधला. सायंकाळी उशिरा समितीची कार्यवाही पूर्ण झाली. दोन दिवसांत समितीने १५० विद्यार्थी, २० प्राध्यापक आणि वसतिगृहातील रेक्टर, वॉर्डन, लिपिक, आदींशी संवाद साधला. समितीकडे एका प्राध्यापिकेसह काही विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उपप्राचार्य उपाध्याय यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल केल्या. त्या अनुषंगानेदेखील समितीने चौकशी केली. समितीच्या अध्यक्षांनी प्राचार्य प्रशांत पट्टलवार आणि उपप्राचार्य उपाध्याय यांची प्रश्नावलीच्या माध्यमातून चौकशी केली. संबंधित प्रश्नावलीची उत्तरे प्राचार्य व उपप्राचार्यांनी लेखी स्वरूपात समितीला दिली. या चौकशीचा अहवाल समिती तयार करुन आज, शनिवारी तंत्रशिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांना तो सादर करणार आहे. (प्रतिनिधी)
उपप्राचार्यांना निलंबित करा
मुलांना घेऊन मुलींच्या वसतिगृहात जाणाऱ्या, परीक्षेला बसू न देण्याची धमकी देणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य अशोक उपाध्याय यांना निलंबित करा. वसतिगृहासाठी पूर्णवेळ महिला रेक्टरची नेमणुका अशा विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) शिष्टमंडळाने प्राचार्य पट्टलवार यांना दिले. या मागणीसह तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाने प्राचार्य पट्टलवार यांच्याशी चर्चा केली. यावर प्राचार्य पट्टलवार यांनी पूर्ण रेक्टर नेमण्याबाबत शासनाकडे मागणी केली जाईल. मेसबाबत विद्यार्थी समिती नियुक्ती करण्यासह मेसचालकाला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे सांगितले. शिष्टमंडळात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष दिलीप मेत्राणी, मारुती भागोजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिग्विजय कालेकर, सरचिटणीस अक्षय मोरे, जयराज निंबाळकर, धैर्यशील देसाई, पारस पलिचा, विजय सुतार, आदींचा समावेश होता.
‘मेस’बाबत सक्ती नको
तंत्रनिकेतनमधील मेस आणि वसतिगृहातील गैरव्यवहार थांबवा. ‘मेस’बाबत विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येऊ नये, अशा विविध स्वरूपांतील मागण्यांबाबत आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे (एआयएसएफ) प्राचार्य पट्टलवार यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्याशी चर्चाही केली. यावर प्राचार्य पट्टलवार यांनी ‘मेस’बाबत विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाणार नाही. तसेच मेससाठी विद्यार्थ्यांचे नऊ महिन्यांचे घेतलेले आगाऊ पैसे परत दिले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी भाकपचे जिल्हा निमंत्रक सतीशचंद्र कांबळे, शहर सचिव अनिल चव्हाण, आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय परिषद सदस्य गिरीश फोंडे, एआयएसएफचे शहर सचिव आरती रेडेकर, जिल्हा सचिव प्रशांत आंबी, योगेश कसबे, प्रशांत कोळी, आदींचा समावेश होता.