गगनबावड्याला देखण्या वाड्यात माहितीपूर्ण संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:24+5:302021-02-05T07:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आपला इतिहास अतिशय वैभवशाली आहे. मात्र, या इतिहासाच्या अनेक खुणा जपण्यामध्ये मात्र आम्ही दरिद्रीपणा ...

गगनबावड्याला देखण्या वाड्यात माहितीपूर्ण संग्रहालय
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आपला इतिहास अतिशय वैभवशाली आहे. मात्र, या इतिहासाच्या अनेक खुणा जपण्यामध्ये मात्र आम्ही दरिद्रीपणा दाखवला आहे. मात्र, याला अपवाद ठरले आहेत नीलराजे बावडेकर. त्यांनी गगनबावड्याच्या अलिकडे ९ किलोमीटरवर असणाऱ्या त्यांच्या देखण्या वाड्यामध्ये माहितीपूर्ण असे संग्रहालय साकारले आहे. या संग्रहालयाला आता नागरिकांचाही प्रतिसादही मिळत आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वास्तविक अनेक संस्थांने कार्यरत होती. करवीर, इचलकरंजी, कुरूंदवाड ही त्यापैकी काही. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे माहितीपूर्ण संग्रहालय न्यू पॅलेसवर सध्या आहे. ते ट्रस्टच्यावतीने चालविण्यात येते. मात्र, नीलराजे बावडेकर यांनी अतिशय जाणीवपूर्वक जुन्या वाड्यामध्ये हे संग्रहालय साकारले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य श्री रामचंद्रपंत अमात्य यांचे दहावे वंशज व बावड्याचे जहागीरदार राजे परशुरामराव अमात्य यांनी हा वाडा १९३३ ते १९३५ या कालावधीत बांधला. त्यावेळी त्यांचा गगनबावड्याचा राजवाडा अस्तित्वात होता. हौसेखातर त्यांनी हा वाडा बांधला. परशुरामराजे व माईसाहेब बावडेकर या वाड्यामध्ये सात वर्षे राहिले. मात्र, नंतर हा वाडा बंद राहिला. काही काळानंतर या वाड्यात चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले. ‘पछाडलेला’ हा इथे चित्रीकरण झालेला सर्वात नावाजलेला चित्रपट.
अतिशय देखणा वाडा बंद ठेवणे बावडेकर घराण्याचे सध्याचे वंशज नीलराजे बावडेकर यांना योग्य वाटेना. मग त्यांनी येथे संग्रहालय करण्याचे ठरवले. दिनांक २६ डिसेंबर २०१८ला हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. यामध्ये वीरगळ, ऐतिहासिक माहिती, रामचंद्रपंत अमात्य व पंत अमात्य घराण्यांची माहिती, जहागीरकालीन फोटो, जहागीरदार घराण्यांची माहिती, वाड्याचे बांधकाम चालू असतानाचे फोटो, माईसाहेब बावडेकर यांचे फोटो व माहिती, जुनी भांडी, फर्निचर, सजलेला दिवाणखाना, शस्त्रास्त्रे (तलवारी, भाले), तोफा , मराठेशाहीच्या पगड्या, ऐतिहासिक पत्रं या संग्रहालयात आहेत.
चौकट
आडिओ, व्हिडीओ सादरीकरण
अमात्य यांच्याबाबत इतिहासात वाचले असले तरी सर्वच माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे वाड्यात गेल्यानंतर दहा मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात येतो. यामध्ये अमात्य यांचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज दुसरे आणि महाराणी ताराराणी यांच्या काळातील कामगिरीचा आढावा पाहावयास मिळतो.
२७०१२०२१ कोल बावडेकर वाडा ०१
गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यासमोर असलेला हा पंत अमात्य यांचा वाडा
२७०१२०२१ कोल बावडेकर वाडा ०२
या वाड्यातील संग्रहालयामधील जुन्या पध्दतीची बैठक रचना