इंग्लंडमध्ये १५५ वर्षांपूर्वी झळकले कोल्हापुरातील 'राजाराम'; इतिहासाचा साक्षीदार जपण्याची गरज
By संदीप आडनाईक | Updated: February 18, 2025 16:27 IST2025-02-18T16:26:42+5:302025-02-18T16:27:58+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूलचा १५५ वा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आज, मंगळवारी साजरा होत आहे. वृत्तपत्रात छायाचित्र छापून ...

कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलच्या इमारतीचे हेच छायाचित्र इंग्लंडच्या वर्तमानपत्रात १५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. (छायाचित्र : सौजन्य गणेश नेर्लेकर)
संदीप आडनाईक
कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूलचा १५५ वा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आज, मंगळवारी साजरा होत आहे. वृत्तपत्रात छायाचित्र छापून येण्याइतकी तांत्रिक प्रगती झाली नव्हती. कोल्हापुरातील नागरिक धोतर, टोपी, पगडी वापरत घोड्यावर बसत होते. त्या काळात इंग्लंडच्या वर्तमानपत्रात कोल्हापुरातल्या या कॉलेजच्या इमारतीची माहिती छायाचित्रासह प्रसिद्ध झाली होती. इतिहासाचा हा साक्षीदार जपण्याची गरज आहे.
या कॉलेजची पायाभरणी १९ फेब्रुवारी १८७० या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता कोल्हापूर इन्फंट्रीच्या बँडच्या तालावर झाली. या समारंभाला उपस्थित कोल्हापुरातील नागरिकांच्या सह्या, तत्कालीन इंग्रजी आणि मराठी नियतकालिके, तसेच प्रचलित नाणी एका तांब्याच्या पेटीत ठेवून ती या इमारतीच्या पायाच्या पहिल्या दगडात खोबण करून जपली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या इच्छेनुसार कोल्हापूर दरबारने ब्रिटिशांमार्फत कोल्हापुरात ही इमारत उभी केली.
पायाभरणीच्या वेळी कोल्हापूर हायस्कूल, बांधकाम झाल्यावर राजाराम हायस्कूल आणि पुढे पॉलिटिकल एजंट फ्रेडरिक श्नायडर यांच्या प्रयत्नामुळे बॉम्बे युनिव्हर्सिटीशी संलग्न झालेले राजाराम कॉलेज अशी या वास्तूची स्थित्यंतरे आहेत. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज कागदावरही नव्हते, तेव्हा मुंबईतल्या एल्फिन्स्टन, विल्सन कॉलेज अशा संस्थांच्या तोडीस तोड असलेले हे राजाराम कॉलेज मुंबईशिवाय दक्षिणेत धारवाडपर्यंत एकमेव होते.
- मेजर चार्ल्स मँट या आर्किटेक्टने या इमारतीची रचना केली. एका आराखड्यात क्षुल्लक त्रुटी राहिल्याने डोक्यात गोळी झाडून त्याने आत्महत्या केली होती. इतका तो परफेक्सनिस्ट होता.
- १८५७ च्या कोल्हापुरातील स्वातंत्र्यसंग्रामातील उठावात सहभागी सैनिकांना ज्या कर्नल ले ग्रँड जेकबने जुन्या राजवाड्याच्या आवारात तोफेच्या तोंडी देऊन आणि फासावर लटकवले होते, त्याने पुढे बॉम्बे युनिव्हर्सिटीत संस्कृत विषयासाठी स्वतःच्या नावाने सुरू केलेली शिष्यवृत्ती सलग १५ वर्षे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिंकून त्याचा अहिंसक बदला घेतला.
- कोल्हापूरकरांना हातात बॅट धरायला लावून क्रिकेट शिकवणारे चार्ल्स एच. कँडी या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.
- ऑलिम्पकमध्ये पहिले कांस्यपदक मिळवून आल्यावर खाशाबा जाधवांचे इथेच नवे प्रवेशद्वार उभारून स्वागत केले होते.