करवीर, पन्हाळा तालुक्यांत ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव
By Admin | Updated: May 15, 2015 00:04 IST2015-05-14T21:51:22+5:302015-05-15T00:04:19+5:30
शेतकरी हतबल : १००० हेक्टर क्षेत्र बाधित, ३० ते ४० टक्के उत्पादनात होणार घट; गारपीट झालेल्या क्षेत्रावर प्रामुख्याने प्रादुर्भाव

करवीर, पन्हाळा तालुक्यांत ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव
मच्छिंद्र मगदूम - सांगरुळ नदीकाठच्या जमिनीत व भातपीक घेतल्या जाणाऱ्या भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो; पण यंदा वळीव पाऊस व गारपीट यामुळे करवीर, पन्हाळा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीमुळे सुमारे १००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या लष्करी अळीने पूर्ण पीकच नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना सुरू केली असून, शेतकऱ्यांनीही संघटित होऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
गेल्या दोन महिन्यांतील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे करवीर, पन्हाळा तालुक्यांतील माजगाव, खोतवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, म्हाळुंगे, कुशिरे, तिरपण, दिगवडे, देसाईवाडी, पाटपन्हाळा, चव्हाणवाडी, बोरगाव, बांद्रेवाडी, आदी परिसरात या लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तसेच दक्षिण कासारी नदीचा परिसरही या अळींनी मोठ्या प्रमाणात व्यापला आहे. यामध्ये लावणीचा लहान ऊस, उशिरा तुटलेला खोडवा, नदीकाठचे गवत, मका, बाजरी व उन्हाळी भात यावर मोठा प्रादुर्भाव झाला आहे. या परिसरामध्ये गारांचा पाऊस आणि गारपीट झाल्याने पुरेशी आर्द्रता मिळाल्याने या किडीच्या वाढीस सुरुवात झाली. जमिनीत थंडावा असल्याने ठिकठिकाणी अळ्या दिसून आल्या आहेत. एकावेळी हल्ला केल्याने विष्ठेचे प्रमाण वाढून दूषित वातावरण निर्माण होते. तसेच अळ्यांमध्ये मेदयुक्त पेशींचे प्रमाण वाढल्याने त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. तसेच या पेशींमुळे रासायनिक कीटकनाशकांना प्रतिकार करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. प्रामुख्याने ही कीड रात्रीच्या वेळीच पिकांवर हल्ला करते. सध्या जिल्हा प्रशासनाद्वारे किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक प्रयत्न सुरू केले आहेत.
तज्ज्ञांच्या मते जैविक नियंत्रणासाठी क्रायसोपरला कारणी हा परभक्षी उपयुक्त कीटक लष्करी अळींची अंडी व लहान अळ्यांचा फडशा पाडतो. क्रायसोपरलाची १००० अंडी किंवा २५०० अळ्या प्रति हेक्टरी प्रादुर्भावग्रस्त शेतात सोडाव्यात, असे सांगण्यात आले आहे, तर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून सामूहिकपणे किडीचे नियंत्रण करावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी जैविक कीड नियंत्रण व रासायनिक कीटक नाशकांच्या वापराने सामूहिकपणे उपाययोजना केल्यास लष्करी अळीचे यशस्वी नियंत्रण करता येईल.
- सुरेश अपराध, शेती अधिकारी, कुंभी कारखाना
प्रामुख्याने एकाच वेळी अंड्यांतून बाहेर आल्यानंतर शेतातील पिकावर सैनिकांप्रमाणे हल्ला करतात, म्हणून या किडीला लष्करी अळी असे संबोधले जाते. प्रामुख्याने उसाचे पान फस्त करून फक्त पानाचे देठच शिल्लक ठेवतात. ऊस, भात, मका, गवत, आदी पिकांवर ही अळी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता असते.
गारपीट आणि वळीव पावसाने लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने एक एकर क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या एकात्मिकपणे नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संभाजी गायकवाड, शेतकरी, पुशिरे, ता. पन्हाळा