खाद्यतेलाला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:25+5:302021-01-04T04:20:25+5:30

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर दिवसागणिक वाढत चालल्याने भाजीपाला स्वस्त असला तरी फोडणी मात्र महागली आहे. शेंगतेल १६५, सोयाबीन व ...

Inflation burns edible oil | खाद्यतेलाला महागाईची फोडणी

खाद्यतेलाला महागाईची फोडणी

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर दिवसागणिक वाढत चालल्याने भाजीपाला स्वस्त असला तरी फोडणी मात्र महागली आहे. शेंगतेल १६५, सोयाबीन व सूर्यफूल १५० आणि सरकी १३० रुपये असा किलोचा भाव झाला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर वाढले आहेत. दररोज किमान दोन ते तीन रुपयांनी दर वाढत असल्याने किचन बजेटचे बारा वाजले आहेत.

रविवारी लक्ष्मीपुरीत साप्ताहिक बाजारभावाचा आढावा घेतला असता, अजूनही भाजीपाल्यातील स्वस्ताई कायम असल्याचे दिसले. कोथिंबीर, मेथी, पोकळा, शेपू, पालक, कोबी, फ्लाॅवर यांचे ढीगच लागले आहेत. पाच ते दहा रुपये असा दर आहे. गवारी २५ रुपये पावशेर सोडली, तर इतर सर्व भाज्या १० रुपये पावशेरच्या घरातच आहेत. मुळा, पावटा, चपट्या शेंगांसह चाकवतच्या भाजीचे बाजारात आगमन झाले आहे. दहा ते पंधरा रुपयांना दोन असा दर आहे.

चाैकट ०१

कांदा, बटाटा पुन्हा वधारला

गेल्या आठवड्यात दहा रुपयांनी कमी झालेला कांदा व बटाटा या आठवड्यात पुन्हा वाढू लागला आहे. ४० रुपये किलो असा दर आहे. लसूण ८० रुपये तर आले ३० रुपये किलो आहे. टोमॅटो २० रुपयांना दीड किलो दर आहे. लिंबू दहा रुपयांना दहा असा दर सुरू आहे.

चौकट ०२

वडापावच्या दरात केळी

केळीचे दर कधी नव्हे इतके घसरले आहेत. पाच ते दहा रुपये डझन अशी आरोळी बाजारात ऐकायला येत आहे. २० रुपये दर चांगल्या प्रतीच्या केळांचा आहे. त्यामुळे बाजारात वडापावच्या दरात डझनभर केळी खा, अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. नारळाच्या दरातील तेजी अजूनही कायम आहे. किमान १७ ते ३५ रुपये असा रोजचा नारळाचा दर आहे.

चौकट ०४

तिखटासाठीच्या लालमिरचीची आवक वाढू लागली आहे. अजून फारसे गिऱ्हाईक नाही, पण चांगल्या दर्जाच्या मिरच्या दिसत आहेत. दर २०० ते ४०० रुपये या पटीत आहे. तिखटासाठी लागणारे मसालेही बऱ्यापैकी आवाक्यात आहेत. खोबरे १५०, तीळ १२०, धने १२०, जिरे १५० रुपये असा किलोचा दर आहे.

Web Title: Inflation burns edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.