मसोलीतील मुख्यमंत्री सडक योजनेचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:37+5:302021-05-07T04:24:37+5:30
आजरा : आजरा-आंबोली मार्गावरील मसोली फाटा ते मसोली गावापर्यंतचे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. ८० लाखांच्या या कामाचा ...

मसोलीतील मुख्यमंत्री सडक योजनेचे काम निकृष्ट
आजरा : आजरा-आंबोली मार्गावरील मसोली फाटा ते मसोली गावापर्यंतचे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. ८० लाखांच्या या कामाचा वळवाच्या पावसाने पंचनामा केला आहे. त्यामुळे तातडीने या कामाची चौकशी करावी, अशी मागणी मसोलीच्या सरपंच माधुरी तेजम, माजी सरपंच सुरेश होडगे व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मसोली गावापर्यंतच्या या रस्त्यावर ७ मोऱ्या असून, लांबी १.२०० किलोमीटर इतकी आहे. या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याचे काम ठेकेदाराने टेंडरप्रमाणे न करता मनमानी पद्धतीने केले आहे. संबंधित काम चांगले होत नसल्याबद्दल बांधकाम विभागाचे अधिकारी सातपुते यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. चार दिवसांपूर्वी केलेल्या सीलकोटचा वळवाच्या पावसाने पंचनामा केला आहे. काम निकृष्ट झाल्यामुळे आताच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
संबंधित कामाची तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अन्यथा मसोली गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची पाठराखण केल्यामुळे रस्ते व मोऱ्यांचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले आहे. याबाबत तातडीने कामाची चौकशी व्हावी, अशीही मागणी सरपंच माधुरी तेजम, माजी सरपंच सुरेश होडगे व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.