उद्योगी आणि कष्टकरी स्वकुळ साळी समाज
By Admin | Updated: May 11, 2015 01:07 IST2015-05-11T01:05:39+5:302015-05-11T01:07:07+5:30
मूळचा काशी, पैठणचा : कोल्हापुरात साधारणत: तीन, तर इचलकरंजीत १५ हजार समाजबांधव

उद्योगी आणि कष्टकरी स्वकुळ साळी समाज
इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूर
समाजव्यवस्थेमधील बारा बलुतेदारांपैकी एक स्वकुळ साळी समाज भगवान जिव्हेश्वर यांना आद्यदैवत मानणारे आणि वस्त्र निर्मितीत अग्रेसर असलेल्या स्वकुळ साळी समाजाने कालानुसार उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. फौंड्री उद्योग, व्यापार, व्यवसायात व्यस्त असलेल्या या समाजाने कोल्हापुरात
आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटविला आहे.
स्वकुळ साळी समाज कोल्हापुरात फारसा परिचित नसला, तरी सोलापूर, पुणे यासारख्या शहरांत या समाजबांधवांची मोठी लोकसंख्या आहे. हा समाज मूळचा काशी आणि पैठणचा. आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांचा शंकराच्या जिव्हेवर जन्म झाला म्हणून त्यांना जिव्हेश्वर म्हणतात, अशी एक आख्यायिका आहे. श्रावण त्रयोदशीला भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. समाजासाठी ते वस्त्रप्रावरणे निर्माण करत. त्यामुळे या समाजाचा वस्त्र, विणकाम, हातमाग हा मुख्य व्यवसाय राहिला.
कष्टकरी समाज अशी मुख्य ओळख
पूर्वीच्या काळी हाताने वस्त्रे विणावी लागत. त्यामुळे घरोघरी हा व्यवसाय केला जात असे. कालांतराने हातमागाची नवनवीन साधने उपलब्ध झाली. स्वातंत्र्यानंतर यंत्रसामग्री आल्याने कारखानदारी सुरू झाली. त्यामुळे हा व्यवसाय हळूहळू बंद पडू लागला. त्यामुळे उत्पन्नाची अन्य साधने शोधली गेली, त्यातून स्थलांतर झाले. अशारितीने स्वकुळ साळी समाज कोल्हापुरात स्थायिक झाला. पूर्वी शनिवारपेठेतील साळी गल्लीत समाज बांधव राहात. मात्र, येथून छत्रपतींचा रथ जाताना वही पांजणीमुळे अडथळा होत असे, त्यामुळे १९४०-४५च्या दरम्यान छत्रपती संस्थानाने समाजाला राजारामपुरीत जागा दिली.
कोल्हापूर शहरात समाजाची नोंदणी १९५० साली झाली. जिल्ह्यातील नोंदणी १९८५ साली झाली. कोल्हापूर, इचलकरंजीसह रेंदाळ, हुपरी, वडगाव, कोडोली, घोटवडे या ठिकाणीही समाजबांधव आहेत. राजाराम पैठणकर, लक्ष्मण ढवर, बळवंतराव मुदगल यांनी त्याकाळी समाजाची धुरा सांभाळली होती.
समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गुणवंतांचा सत्कार, महिला व लहान मुलांच्या विविध स्पर्धा, असे उपक्रम राबविले जातात. साठ टक्क्यांहून अधिक गुण
मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महत्त्वाची आर्थिक मदत केली जाते. समाजाचे महिला मंडळदेखील असून, वंदना
दुधाणे या अध्यक्षा आहेत. मंडळाच्यावतीने महिलांसाठी भिशी चालविली जाते.