‘जीबी सिंड्रोम’ नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा
By Admin | Updated: July 10, 2017 00:31 IST2017-07-10T00:31:16+5:302017-07-10T00:31:16+5:30
‘जीबी सिंड्रोम’ नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा

‘जीबी सिंड्रोम’ नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नांदवडे (ता. चंदगड) येथे जीबी सिंड्रोम या आजाराने दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; याबाबत सीपीआर रुग्णालयात एक रुग्ण दाखल असून, त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच अशा आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीपीआर रुग्णालयाची यंत्रणा सज्ज असल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
‘जीबी सिंड्रोम’ या नव्या आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. हा आजार संसर्गजन्य नसला तरीही त्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदवडे येथील एकाचा बेळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात, तर दुसऱ्या रुग्णाचा कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी (दि. ७) मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
वातावरणातील बदलामुळे हा आजार होत आहे. हे रुग्ण वाढू नये म्हणून दक्षताही घेणे आवश्यक आहे. या आजारावरील औषध हे दुर्मीळ व खूप महाग आहे. सीपीआर रुग्णालयात सध्या या आजाराचा ग्रामीण भागातील एक रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णाला महात्मा फुले योजनेतून औषधोपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
‘सीपीआर’मध्ये दक्षता
जीबी सिंड्रोमसदृश रुग्ण सीपीआरमध्ये दाखल झाल्यास तातडीने त्याच्या सर्व निदान चाचण्या करून त्वरित औषधोपचार करण्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी डॉक्टरांची बैठक डॉ. बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यामध्ये सर्व डॉक्टरांना विविध सूचना देऊन दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
स्वाइन फ्लूसाठीही वॉर्ड
स्वाइन फ्लूसाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात सुसज्ज आणि अत्याधुनिक वॉर्ड कार्यरत आहे. यामध्येही एक रुग्ण उपचार घेत आहे. त्याच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.
नांदवडेतील त्या दोघांचा मृत्यू जीबी सिंड्रोमनेच
चंदगड : नांदवडे (ता. चंदगड) येथील जोतिबा गुंडू मोरे (वय ५५) व रमेश कृष्णा सुतार (३५) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू जी. बी. सिंड्रोम या रोगानेच झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खोत यांनी सांगितले. दर एक लाख लोकांमध्ये एकाला या रोगाची लागण होते. हा रोग संसर्गजन्य किंवा साथीचा नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन करून नांदवडेमध्ये आरोग्यपथक तैनात केल्याचे सांगितले.
जीबी सिंड्रोमची लक्षणे
हा संसर्गजन्य रोग नाही. मधुमेह, रक्तदाब यासारखाच हा आजार आहे. तो श्वसन आणि मेंदूशी निगडित असल्याने अशा रुग्णाला प्रथम ताप येतो. त्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास होतो. रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असते. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर या आजाराचे निदान लागते.