अवकाळीने कृष्णाकाठचा द्राक्षबागायतदार हवालदिल
By Admin | Updated: March 16, 2015 00:05 IST2015-03-15T22:59:32+5:302015-03-16T00:05:47+5:30
भिलवडी परिसरात स्थिती : उत्पादकांचे अतोनात नुकसान

अवकाळीने कृष्णाकाठचा द्राक्षबागायतदार हवालदिल
शरद जाधव - भिलवडी गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पलूस तालुक्यातील विशेषत: कृष्णाकाठच्या परिसरातील गावांमधील शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने लाखोंचा फटका बसला आहे.कृष्णाकाठ तसा ऊस उत्पादक शेतीचा पट्टा, पाण्याची मुबलक उपलब्धता. येथील शेतकरी वर्गही प्रयोगशील. नेहमी नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा शेतकऱ्यांचा हातखंडा. भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, माळवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, बुरूंगवाडी, हजारवाडी, आमणापूर, बोरजाईनगर, पलूस, विठ्ठलवाडी, कुंडल, बांबवडे, आंधळी, मोराळे आदी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे पीक घेतले जाते. काही ठिकाणी काळी, कसदार, पाणी साचून राहणारी जमीन, तर काही ठिकाणी मुरमाड निचऱ्याची जमीन. माळरानामध्ये विहिरीचे तसेच कृ ष्णा नदीतून जलवाहिनी करून शेतकऱ्यांनी पाण्याची सोय केली. काळ्या जमिनीमध्ये मुरूम टाकून पाण्याच्या निचऱ्याच्या सोय करून शेतकऱ्यांनी कष्टाने द्राक्षबागा फुलविल्या. काही काळ मोठा फायदाही मिळविला.
परराज्यातील द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनाही घडल्या. पण, निसर्गाने दिलेली साथ, भरघोस उत्पादन, मालास मिळालेला योग्य दर यामुळे शेतकरी वर्ग कसाबसा सावरत होता. पण बघता-बघता द्राक्षबागेचे क्षेत्रही कमालीचे वाढले. पण यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांना योग्य साथ दिली नसल्याने वेलीवरील घडांची संख्या कमी आहे. बागायतदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन महागड्या औषधांचा व खतांचा वापर करून आलेल्या मालाचा दर्जा टिकविण्याचा प्रयत्न केला. परंतु वादळ-वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मणी फुटून द्राक्षांचे नुकसान झाले. वेलीवरच द्राक्षाचे घड पाणी साचल्याने कुजत आहेत. प्रमाणापेक्षा जादा पाणी झाल्याने द्राक्षाची गोडीही कमी झाली आहे.
पावसामुळे मार्केटमध्ये मंदी असल्याने मुंबईला माल पाठविला जात नसल्याने, मोठे व्यापारी पलूस तालुक्यात फिरकलेच नाहीत. मार्च एण्ड आल्याने बॅँकांनी कर्ज वसुलीचा तगादा मागे लावला आहे. वर्षभर उधारीवर आणलेल्या खतांची, औषधांची देणीही देणे बाकी आहे. शेतात पीक असूनही त्याची विक्री कशी करायची? हा मोठा प्रश्न आहे.
काही ठिकाणी चांगला माल बघून केरळ, कर्नाटक राज्यातील व्यापारी द्राक्षे खरेदी करत आहेत. पावसामुळे चिखल झाल्याने द्राक्षांच्या घडाची छाटणी करून कॅरेटमध्ये भरून वाहतूक करून माल रस्त्यावर व्यापाऱ्यांच्या वाहनापर्यंत वाहतूक करून पोहोचविला जात आहे. हा भुर्दंडही बागायतदारांनाच सोसावा लागत आहे.
स्टॉल मांडून द्राक्ष विक्री सुरु
रस्त्याकडेला बाग असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांनी स्टॉल मांडून दररोज थोेडा-थोडा माल विकणे सुरू केले आहे. प्रति एकरी सत्तर हजारांपासून लाख रूपयांची कर्जे काढून पिकासाठी केलेला उत्पादन खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांना परमेश्वराच्या भरोशावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.