ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटनांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:55+5:302021-01-04T04:20:55+5:30
इचलकरंजी : कापड गाठीच्या ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबत इचलकरंजी गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, वेअर हाऊस, लॉरी ऑपरेटर ...

ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटनांत वाढ
इचलकरंजी : कापड गाठीच्या ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबत इचलकरंजी गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, वेअर हाऊस, लॉरी ऑपरेटर असोसिएशन व मॅँचेस्टर मोटार मालक संघटना यांची संयुक्त बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. दरम्यान, दरवाढीसंदर्भात आठ दिवसांत निर्णय न झाल्यास काम बंद ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला.
वस्त्रोद्योगाचे मुख्य स्थान असलेल्या शहरात वाहतुकीचे प्रमाण वाढले असून, या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ट्रक असोसिएशनने आरटीओ नियमाप्रमाणे गाडी हाईट लोडिंग न करता आहे त्याच भाड्याने गाडी भरण्याचे आवाहन केले, तशा आशयाचे निवेदन देऊन निर्णय न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीवेळी दोन्ही असोसिएशनने सध्याच्या बुकिंग दरामध्ये वाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढावा. त्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह पाली, बालोत्रा, जोधपूर येथील व्यापाऱ्यांशी चर्चा करून आठ दिवसांत निर्णय जाहीर करावा; अन्यथा निर्णय न झाल्यास काम बंद ठेवावे लागेल, असे ठरले.
चर्चेत अशोक शिंदे, प्रदीप बहीरगुंडे, जितेंद्र जानवेकर, राजू जगताप, मुकेश दधीन, संजय अवलक्की, आदींनी भाग घेतला. यावेळी पाली, बालोत्रा, जोधपूर, अहमदाबाद मार्गावर वाहतूक करणारे ट्रकमालक-चालक उपस्थित होते.