corona in belgoan- बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ९ रुग्ण, आकडा सव्वाशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:00 IST2020-05-21T17:55:39+5:302020-05-21T18:00:24+5:30
बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९ रुग्णांची वाढ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बागलकोट मधील ८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे.

corona in belgoan- बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ९ रुग्ण, आकडा सव्वाशे पार
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची आणखी ९ रुग्णांची वाढ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बागलकोट मधील ८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी नवीन ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. रामदुर्ग तालुक्यातील कल्लूर गावच्या सात महिन्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. रामदुर्ग तालुक्यात या लहान मुलीच्या माध्यमातून कोरोनाची एन्ट्री झाली आहे. ७ मे रोजी कोल्हापूरमधून आलेल्या कुटुंबाला बटकुरकी गावात क्वांरंटाइन करण्यात आले होते. या कुटुंबापैकी सात महिन्याच्या बाळाला कोरोना झाला आहे.
झारखंड येथील सम्मेद शिखरजी येथील धार्मिक स्थळाला भेट देऊन आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा जडली आहे. यामध्ये ६५, ६३ आणि ७५ वर्षीय वृद्धांचा समावेश आहे. दीड महिन्यापूर्वी १५ जणांच्या सोबत ते सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळी जाऊन आले होते. ६ मे पासून कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीमध्ये त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले होते.
राजस्थानातील अजमेर येथून परत आलेल्या आणखी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. बैलहोंगल तालुक्यातील संपगाव येथील २४ वर्षीय युवक आणि २५ वर्षीय युवक कोरोना पीडित आहेत. ८ मे पासून संपगाव हायस्कूलमध्ये अजमेर रिटर्न असलेले ८ जण संस्थात्मक अलगीकरणात होते. त्यातील हे दोघेजण आहेत.
हिरेबागेवाडी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४३ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे हिरेबागेवाडीचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. मुंबई रिटर्न असलेल्या हुक्केरी येथील दोघांना कोरोना झाला आहे त्यामुळे मुंबई कनेक्शनमध्ये वाढ झाली आहे. बाहेरील राज्यातून आलेले ८ व प्रथमच संपर्कात आलेला एक जण असे ९ जण गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
बैलहोंगल कागवाड रामदुर्ग या तीन नवीन ठिकाणी जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरवले आहेत. बेळगावात ११९ तर बागलकोटचे बेळगावात उपचार घेत असलेले ८ असे मिळून १२७ कोरोनाचे रुग्ण सध्या बेळगावात आहेत.