उत्पन्न वाढीसाठी मिळकतींचे फेरसर्वेक्षण

By Admin | Updated: March 9, 2016 00:36 IST2016-03-09T00:36:50+5:302016-03-09T00:36:50+5:30

सोमवारपासून प्रारंभ : महापालिकेचा खासगी कंपनीस ठेका, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत

Income supervision for income generation | उत्पन्न वाढीसाठी मिळकतींचे फेरसर्वेक्षण

उत्पन्न वाढीसाठी मिळकतींचे फेरसर्वेक्षण

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील सर्व मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याचे काम सोमवार (दि. १४) पासून हाती घेतले जाणार आहे. हे काम खासगी ठेकेदारावर सोपविण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करून त्याची माहिती महानगरपालिकेला द्यायची आहे. त्यामुळे सध्या ज्या मिळकतींना घरफाळा लागू झालेला नाही, तो लागू होईल आणि पर्यायाने पालिकेचे उत्पन्न वाढेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
कोल्हापूर महानगरपालिका सध्या शहरवासीयांवर सन २०११-२०१२ सालच्या रेडीरेकनरवर आधारित घरफाळ्याची आकारणी करीत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून २०१५-२०१६ सालच्या रेडीरेकनरवर घरफाळा आकारण्याचा प्रस्ताव होता ; परंतु त्याला महासभेने मंजुरी न देता प्रचलित दरानेच घरफाळा आकारणी करावी, असा आदेश प्रशासनास दिला आहे. त्यामुळे घरफाळ्याचे उत्पन्न वाढण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच महापालिका प्रशासनाने सध्या घरफाळा भरत नसलेल्या इमारती तसेच अतिरिक्त बांधकाम झालेल्या मिळकती शोधून काढून त्यांच्यावर नव्याने घरफाळा आकारणी करण्यासाठी शहरातील सर्वच मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सायबर टेक’ नावाच्या खाजगी कंपनीला सर्व्हेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे ६० कर्मचारी पुढील सहा महिन्यांत शहरात सर्वत्र घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहे. घराची, फ्लॅटची मोजमापे घेणार आहेत. तसेच मिळकतीचा वापर वाणिज्य आहे की निवासी आहे, याचीही ते माहिती घेतील. त्यानंतर संबंधित मिळकतधारकाचे परिपूर्ण माहितीपत्रक तयार करून कंपनीचे कर्मचारी महापालिकेस ते सादर करतील. त्यानंतर पालिकेचा सध्याची माहिती तपासून ज्यांच्यावर घरफाळा लागूच झालेला नाही किंवा ज्यांचे बांधकाम अतिरिक्त झालेले आहे, त्यांच्यावर योग्य घरफाळा लावला जाईल. तत्पूर्वी मिळकतधारकांना हरकतीची संधी देण्यात येणार आहे.
फेरसर्वेक्षण झाल्यावर घरफाळा लागलाच नाही अशा मिळकती सापडतील आणि त्यामुळे घरफाळ्याचे उत्पन्न वाढेल, असा दावा आयुक्त पी. शिवशंकर यांनी केला.(प्रतिनिधी)


स्पॉट बिलिंगचा
प्रयोग यशस्वी
शहरातील नळजोडणीधारकांना स्पॉट बिलिंगद्वारे बिले देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सध्या सी व डी वॉर्डांतील काम सुरूआहे. मीटर रीडरना बिलिंग करण्यास थोडा विलंब होत आहे; परंतु त्यात गती आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एप्रिलपासून ए व बी वॉर्डांतील नळजोडणीधारकांनाही अशी बिले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


दंडव्याजात सवलत नाही
घरफाळा थकबाकीसाठी आकारण्यात येत असलेल्या दंडव्याजात पंचाहत्तर टक्के सवलत देण्यात यावी, असा स्थायी समितीत ठराव झाला आहे; परंतु गेल्याच वर्षी पन्नास टक्के सवलत देण्यात आल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी अशी सवलत देता येत नाही. त्याला कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे जरी ठराव झाला असला तरी तशी सवलत यंदा मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.



मिळकतींवर बोजा चढविणार
शहरातील पंधरा लाख रुपयांच्या वर थकबाकी आहे, अशा ६० जणांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांची सुनावणीही झाली आहे. त्यांना थकबाकी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Income supervision for income generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.