उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळच बसेना
By Admin | Updated: December 11, 2014 23:50 IST2014-12-11T22:27:50+5:302014-12-11T23:50:42+5:30
आजरा ग्रामपंचायतीसमोर पेच ? : इतर मार्गांतून मिळणाऱ्या उत्पन्नातील खर्चही पाणीपुरवठा योजनेवर

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळच बसेना
ज्योतिप्रसाद सावंत -आजरा ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेवर १ एप्रिल २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना २ लाख ७५ हजार रुपयांच्या सरासरीने तब्बल २२ लाख ५२२० रुपये खर्च झाले असून, येत्या उर्वरित चार महिन्यांकरिता आणखी ९ ते १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २४ लाख रुपये उत्पन्न आणि ३२ ते ३३ लाख रुपये खर्च अशी या पाणीपुरवठा योजनेची अवस्था झाली आहे.
नळपाणी पुरवठा योजनेपासून वार्षिक २२ लाख ५२२० इतके उत्पन्न मिळते. ग्रामपंचायत दप्तरी २३९२ नळपाणी कनेक्शन ग्राहकांची नोंद आहे. एकूण खर्चापैकी कायम व हंगामी नोकरांचे पगार, त्यांना इतर वेतनविषयक लाभ, बोनस यासाठी निव्वळ खर्च साडेनऊ ते दहा लाख रुपये प्रतिवर्षी खर्ची पडत आहेत. नळपाणी पुरवठा योजनेचे वीज बिल १३ ते १४ लाख रुपयांच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त टी.सी.एल. पावडर, लिकेज काढणे, मोटर खरेदी, वाढीव पाईपलाईन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होताना दिसतो. नोकर पगार, विद्युत बिल आणि गळत्या काढणे यामुळे ग्रामपंचायतीला नळपाणी पुरवठा योजनेपासून मिळणारे उत्पन्न व खर्च याचा काहीच ताळमेळ बसेनासा झाला आहे.
आगीतून फुफाट्यात प्रमाणे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य टाकीला मोठी गळती असल्याने ही गळती काढणे व विद्यानगर येथील हिरण्यकेशी नदीशेजारील पंपहाऊसची दुरुस्ती करणे यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येत्या चार महिन्यांत करण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषदेकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; पण पुढे काय आहे? त्याचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाकडे सध्यातरी नाही. २००७-०८ साली नव्याने मंजूर झालेल्या योजनेचे ग्रामपंचायतीकडे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. सद्य:स्थितीला जसे आहे तसे हस्तांतरण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजनेचे पुढे काय? याचे उत्तर मिळणार नाही. या सर्व प्रकारात ग्रामपंचायतीला इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे
दहा लाख रुपये पाणीपुरवठा योजनेवर प्रतिवर्षी खर्च करावे लागत आहेत. हा भुर्दंड ग्रामपंचायतीला अडचणीचा ठरत आहे.