पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या शुभंकराचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:27 IST2020-02-04T16:47:40+5:302020-02-04T17:27:47+5:30
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या ‘शुभंकर’चे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

कोल्हापुरातील वि. स. खांडेकर विद्यालयात मंगळवारी बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी मिलिंद कोपार्डेकर, शैला टोपकर, श्यामला पवार, उषा सरदेसाई, सुधाकर सावंत, अभय बकरे, गुलाबराव देशमुख उपस्थित होते.
कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या ‘शुभंकर’चे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर विद्यालयात झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक उषा सरदेसाई, खांडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्यामला पवार आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सलग दोन दिवस शाहू स्मारक भवन येथे रंगणाऱ्या या महोत्सवात जगभरातील सहा उत्तम चित्रपट या विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येणार आहेत.
वि. स. खांडेकर विद्यालयात झालेल्या महानगरपालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद कोपार्डेकर यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली, तर बालचित्रपट महोत्सवाचे समन्वयक मिलिंद नाईक यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी यावेळी चिल्लर पार्टीच्या कामाचे कौतुक करून आशयघन चित्रपटांमुळे मुलांच्या ज्ञानाचे भांडार वाढेल, असे सांगितले.
कागदाचे विमान उडविणाऱ्या मुलीचे छायाचित्र हा यावेळच्या बालचित्रपट महोत्सवाचा ‘शुभंकर’ आहे. यावेळी सर्व शाळांमधील विद्यार्थी कागदाचे विमान तयार करणार असून सर्व कागदी विमानांचे प्रदर्शन चिल्लर पार्टीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा कागद चिल्लर पार्टीने उपलब्ध करून दिला.
या बैठकीत महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी ३५ हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षक नेते सुधाकर सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर अभय बकरे यांनी आभार मानले. यावेळी सलीम महालकरी, चंद्रशेखर तुदीगाल, ओंकार कांबळे, गुलाबराव देशमुख, आदी उपस्थित होते.