पाचशे रुपये वर्गणी पूर्ण करणारे अक्रियाशील सभासद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:04+5:302021-03-24T04:23:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी संघाचे जे सभासद पाचशे रुपये शेअर्स वर्गणी पूर्ण करणार नाहीत, त्यांना अक्रियाशील सभासद ...

पाचशे रुपये वर्गणी पूर्ण करणारे अक्रियाशील सभासद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी संघाचे जे सभासद पाचशे रुपये शेअर्स वर्गणी पूर्ण करणार नाहीत, त्यांना अक्रियाशील सभासद करण्याचा निर्णय ठराव संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. त्याचबरोबर त्र्यंबोली पेट्रोलपंप जागा खरेदीस सभेने मान्यता दिली आहे.
शेतकरी संघाची सभा ऑनलाइन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष जी. डी. पाटील होते.
अहवाल वाचन संघाचे मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब निर्मळ यांनी केले. अध्यक्ष जी. डी. पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वी संघाला २२ कोटींचा तोटा होता, तो भरून काढून संघ नफ्यात आणला. संघाचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहिलो. कोरोनामुळे यंदा संघाची उलाढाली कमी झाली असली तरी सभासदांना ११ टक्के लाभांश दिला आहे.
संघाने भागभांडवल वाढीचा निर्णय घेतला असून, त्यानुसार शंभर रुपयाची आता पाचशे रुपये वर्गणी झाली आहे. ती भरण्यासाठी वारंवार आवाहन करूनही काहींनी पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे पाचशे रुपये वर्गणी नसणाऱ्यांना अक्रियाशील सभासद करण्याचा ठराव सभेत करण्यात आला. त्याचबरोबर त्र्यंबोली पेट्राेल पंपाची जागा खरेदीचा निर्णयही सभेत घेण्यात आला. आभार उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मानले.
प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबला- सुरेश देसाई
कोल्हापूर : निवडणूकीपूर्वी संघ तोट्यात असल्याची चुकीची माहिती अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी सभेत दिली. त्यासह एकूणच भ्रष्टाचारी कारभाराबाबत विचारणा करताना आपणास डिस्कनेक्ट केल्याचा आरोप संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी केला. आपल्या सारख्या हजारो सभासदांमध्ये कारभाराबाबत असंतोष खदखदत आहे. मात्र, ऑनलाइनच्या आडून त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही देसाई यांनी सांगितले.
देसाई म्हणाले, पाच वर्षांत कसा कारभार केला, हे सभासदांना माहिती आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा नफा आहे की तोटा हे कर्मचारी व सभासदांना चांगलेच माहिती आहे. याबाबतच प्रश्न विचारत असताना आपण अडचणीत येतो म्हटल्यावर डिस्कनेक्ट केले. अशा प्रकारे आवाज दाबून कारभार झाकला जाणार नाही, याचे भान कारभाऱ्यांनी ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.
कर्मचाऱ्यांकडूनच मंजूर मंजूरच्या घोषणा
ऑनलाइन सभा असल्याने संघ व्यवस्थापनाने मुख्य कार्यालयात प्रत्येक विषयाला मंजूर मंजूर म्हणण्यासाठी कर्मचारी बसविले होते. तेच मोठ्या आवाजात घोषणा देत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.