शरद यादवकोल्हापूर : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पालिकेत नवाच राजकीय रंग पहायला मिळत आहे. विधानसभेला एकमेकाविरुद्ध लढलेले अचानक विकासाच्या नावाखाली एकत्र आल्याचे पाहून कार्यकर्त्यांसह सामान्यही चक्रावून गेले आहेत. तुम्ही असे मनेामिलन करणार होताच तर आम्हाला गावागावात डोकी फोडायला का लावली, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कागलमधील पॉलिटिकल ड्रामा, चंदगडची नैसर्गिक युती व शिरोळमध्ये विकासासाठी सारे एक असे नमुने पाहून याच साठी केला होता का अट्टाहास, असा प्रश्न हाडाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.कागल पालिकेच्या रणांगणात हाडवैर असलेले मुश्रीफ-समरजीत एकत्र येताच जिल्ह्यात खळबळ उडाली, तर चंदगडमध्ये माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाभूळकर यांनी एकत्र येत शिवाजी पाटील यांना शह द्यायचे ठरविले आहे. शिरोळमध्ये यड्रावकर-उल्हास पाटील यांनी विकासाचा सूर लावत एकी केली. विधानसभेला विरोधात लढलेले हे नेते पालिकेसाठी एकत्र आल्याने सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. नेते स्वत:च्या फायद्यासाठी कधीही एकत्र येणार असतील तर कार्यकर्त्यानेच उठता बसता निष्ठेचा सूर का आळवावा, याचा विचार करण्याची गरज आहे.
कालचे आरोप खोटे की आजचे वागणे...विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या नेत्यांनी एकमेकांना भ्रष्ट, स्वार्थी, घराणेशाही आणणारे असे शेलके आरोप करत तुरुंगात टाकायची भाषा केली होती. कार्यकर्तेही त्याच तडपेने आपल्या नेत्याची बाजू लावून धरत होते. आज मात्र हेच नेते एकत्र येऊन विकासाची भाषा करत असतील तर कालपर्यंतचे बोलणे खोटे होते की तुम्ही आज सांगताय ते लबाड आहे, असा प्रश्न सामान्यातून केला जात आहे.
कोंबडी दारातून गेली म्हणून मारामारीराजकीय विद्यापीठातील इर्षा जिल्ह्याला चांगलीच परिचित आहे. मंडलिक - घाटगे यांचा संघर्ष राज्यात गाजला होता. त्यावेळी विरोधकाची कोंबडी दारातून गेली म्हणून काठ्यांनी हाणामारी झाल्याचे आजही अनेकांना आठवत असेल. विरोधकाचा जन्म या तारखेला झालाच नाही म्हणून मोर्चे काढण्यात आले, ईडीची धाड पडल्यावर आता तुरुंगातच भेटू अशा पोस्ट व्हायरल होत होत्या. परंतु सत्तेच्या पालखीत बसण्यासाठी हे सर्व रात्रीत विसरले जाणार असेल तर कार्यकर्त्यांनीही आणखी किती दिवस डोकी फोडायची याचा विचार करावा.
म्हणे नैसर्गिक युती...चंदगड नगरपंचायतीच्या राजकारणात आमदार शिवाजी पाटील यांना रोखण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील, नंदाताई बाभूळकर, गोपाळराव पाटील यांनी एकत्र येत आघाडी केली. या युतीबाबत सांगताना नेते आमची नैसर्गिक युती असल्याचे सांगत आहेत. आता नैसर्गिक युती होते मग विधानसभेला अनैसर्गिक महायुती का केली, याचे उत्तर काही मिळत नाही.
शिरोळमध्ये तीन तऱ्हाशिरोळ पालिकेच्या मैदानात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व उल्हास पाटील एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील स्वाभिमानीतून यड्रावकर यांच्या विरोधात लढले. आता मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही एकत्र येत असल्याची त्यांनी घोषणा केली. हा आग्रह नेमका कुणी केला, हे काही कळत नाही. जयसिंंगपुरात यड्रावकर, उल्हास पाटील, सावकार विरोधात शेट्टी, गणपतराव, माधवराव एकत्र आले आहेत; परंतु शिरोळमध्ये शेट्टी, गणपतराव एकत्र तर माधवरांचा सवता सुभा आहे तर कुरुंदवाडला यड्रावकरांच्या साथीला भाजपचा एक गट असून, दुसरी भाजप रिंगणात असल्याने एका तालुक्यात तीन तऱ्हा पहायला मिळत आहेत.
यातून कार्यकर्त्यांनी शहाणे व्हावेनेत्यांच्या निष्ठेसाठी गावात कुणालाही अंगावर घेणारे, प्रसंगी मारामाऱ्या करून जेलवारी करून आलेले, सोशल मीडियावरून नेत्यांना देव मानून विरोधकांना शिव्या देणारे चौका चौकात दिसतील. त्यांनी आता नेत्यांचे कारनामे पाहून शहाणे व्हावे. सत्तेच्या सोयीसाठी कोणीही एकत्र येऊ शकतो, हे कटु सत्य स्वीकारून राजकारणासाठी डोकी फोडण्याचा धंदा बंद करावा, यातच सर्वांचे हित आहे.
Web Summary : Kolhapur's local elections see surprising alliances as rivals unite, leaving dedicated party workers questioning their loyalty and sacrifices. Leaders prioritize power, while workers are left to bear the brunt of political rivalries.
Web Summary : कोल्हापुर के स्थानीय चुनावों में आश्चर्यजनक गठबंधन देखने को मिल रहे हैं, क्योंकि प्रतिद्वंद्वी एकजुट हो रहे हैं, जिससे समर्पित पार्टी कार्यकर्ता अपनी निष्ठा और बलिदान पर सवाल उठा रहे हैं। नेता सत्ता को प्राथमिकता देते हैं, जबकि कार्यकर्ता राजनीतिक प्रतिद्वंद्विता का खामियाजा भुगतते हैं।