कोल्हापूर : गांधीनगर पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक शंकर जाधव (वय ४४, रा. बापट कॅम्प) याच्यासह उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे (रा. निगडेवाडी, उचगाव, ता. करवीर) आणि कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय ३३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हे तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. एपीआय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना पथकाने ताब्यात घेतले. तर पीएसआय शिरगिरे पळून गेला. गुरुवारी (दि. १९) दुपारी गांधीनगर पोलिस ठाण्यात ही कारवाई झाली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव याने गेल्या महिन्यात जनावरांची अवैध वाहतूक करणा-या संशयितांवर कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी टेम्पो मालकाकडे लाचेची मागणी केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सात डिसेंबरला जाधव यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षाकडे बदली केली होती. कार परत मिळावी यासाठी तक्रारदार गांधीनगर पोलिस ठाण्यात चकरा मारत होता. त्याच्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून जाधव आणि कांबळे या दोघांना अटक केली. कारवाईची चाहूल लागताच उपनिरीक्षक शिरगिरे पळून गेला. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
Kolhapur: पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय'सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात
By उद्धव गोडसे | Updated: December 19, 2024 16:32 IST