सुधारित : गारठणाऱ्या थंडीत राजू शेट्टी यांचा रात्रभर आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:38+5:302020-12-05T04:56:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, म्हणून दिल्लीत गेली सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन ...

सुधारित : गारठणाऱ्या थंडीत राजू शेट्टी यांचा रात्रभर आत्मक्लेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, म्हणून दिल्लीत गेली सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गारठणाऱ्या थंडीत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश आंदोलन केले. टाळ-मृदंगाचाया गजरात भजन करत केंद्र सरकारला सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.
अदानी, अंबानीसाठी देशातील शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक ते उद्योग भवनपर्यंतचा रस्ता पोलिसांनी सायंकाळनंतर बंद केला. रिक्षा थांब्याजवळच आंदोलकांनी रस्त्यावर जाजम टाकून ठाण मांडून होते. शेजारी ओढा असल्याने तिथे थंडीची तीव्रता जास्त होती. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी घरातूनच भाकऱ्या बांधून आणल्या होत्या. तिथे खर्डा व पिठलं केले होते, रात्री त्याचा आस्वाद घेतला. या आंदोलनामुळे धरणग्रस्तांच्या आंदोलनाची आठवण ताजी झाली.
शेट्टी म्हणाले, नवीन कायद्याच्या आडून बड्या उद्योगपतींना भारतीय अन्न महामंडळ हडप करायचे आहे. त्यांच्या मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन कमी दराने शेतीमाल खरेदी करून तो गोडावूनमध्ये ठेवायचा आणि सुगी संपल्यानंतर तो चढ्या दराने विक्री करण्याचा घाट आहे. यामध्ये शेतकऱ्यांबरोबर सामान्य ग्राहकही भरडला जाणार आहे. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, अजित पोवार, वैभव कांबळे, राजेश पाटील आदी उपस्थित हाेते.
त्यांची डीएनए टेस्ट करा
दिल्लीत आंदोलन करणारे हे शेतकरी नाहीत, अशी वल्गना भाजपचे नेते करत आहेत. या देशातील अन्नदात्याला जे ओळखत नाहीत, त्यांना ‘डीएनए’ टेस्ट करावी लागेल, अशी टीका शेट्टी यांनी केली.
कोंबड्या घ्या म्हणून पळून जाणारे मोकाटच
नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शाश्वती नाही. एकाने कडकनाथ कोंबड्या घ्या म्हटला आणि पळून गेला तसेच प्रकार या नवीन कायद्याने होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
(फोटो पाठवत आहे)
- राजाराम लोंढे