विद्यार्थी पटसंख्येवर परिणाम--शाळा प्रवेशातील वयाचा गुंता....
By Admin | Updated: November 20, 2014 00:01 IST2014-11-19T23:48:21+5:302014-11-20T00:01:42+5:30
मराठी शाळांना नियमांचा फटका--

विद्यार्थी पटसंख्येवर परिणाम--शाळा प्रवेशातील वयाचा गुंता....
प्रदीप शिंदे -कोल्हापूर -शिक्षण खात्याने आखलेल्या शाळा प्रवेशाबाबत राज्यातील समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे ११ महिने निश्चित केले जाणार आहे. मात्र, यापूर्वी पटसंख्या भरण्यासाठी पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीमध्ये प्रवेश दिला गेल्याने शहरी भागात पुढील वर्षी पहिलीसाठी मुले उपलब्ध होणार नाहीत. याचा परिणाम सलग पाच वर्षांतील इयत्तेवर होणार आहे. मुले कमी असल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याचे धोके वाढणार आहेत. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
वाढत्या स्पर्धेमुळे शिक्षणासाठी विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यापूर्र्वीच इयत्ता पहिलीमध्ये त्यांना प्रवेशित करण्याची पालकांची घाई सुरू असते. ते टाळण्यासह शाळाप्रवेशाच्या समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी ५ वर्षे ११ महिने असे वय शिक्षण खात्याने निश्चित केले आहे. वयनिश्चितीच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर मुले-मुली पहिलीमध्ये प्रवेशित होतील. शिवाय त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करता येईल. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत शिक्षण विभागाचे आहे.
शासनाने नवा प्रस्ताव मंजूर केल्यास ज्या मुलांचे वय जुलैमध्ये ५ वर्षे ११ महिने किंवा अधिक असेल, त्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र, सध्या शहरस्तरावरील पटसंख्या भरून काढण्यासाठी अनेक शाळांतून ५ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पालकांच्या मान्यतेने पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला गेला आहे. हा निर्णय झाला तर पुढील शैक्षणिक वर्षात पहिल्या इयत्तेला मुले कमी मिळतील आणि याचा परिणाम फक्त एक वर्ष न राहता पुढील पाच वर्षांतील इयत्तेवर होणार आहे. सरकारने जर या प्रस्तावास मंजुरी दिली, तर अनेक शिक्षक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शासनाचा हा निर्णय योग्य आहे. मात्र, कोल्हापूर शहरातील शाळेमध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिलीच्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. अन्य जिल्ह्यांत तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे निर्णय झाला तर कोल्हापूर शहरातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा. याबाबत सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा. घाईगडबडीत शासनाने कोणताही निर्णय घेतला आणि जर या निर्णयामुळे शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार असेल तर महासंघ शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करील.
- संतोष आयरे, शहराध्यक्ष, राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
मराठी शाळांना नियमांचा फटका
शहरी भागात मुलांना इंग्रजी शाळेमध्ये दाखल करण्याकडे पालकांचा कल असल्याने महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेसह खासगी प्राथमिक शाळेतील पटसंख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविण्यासाठी अनेक शाळांमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीच्या वर्गात दाखल केले आहे. त्यामुळे नव्या नियमाचा फटका लहान शाळांना बसण्याची शक्यता आहे. पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे.
शाळा प्रवेशातील वयाचा गुंता....
यापूर्वी पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीमध्ये प्रवेश दिल्याने शहरी भागात पुढील वर्षी पहिलीसाठी मुले उपलब्ध होणार नाहीत
परिणाम सलग पाच वर्षांतील इयत्तेवर होणार
शिक्षक अतिरिक्त होण्याचे धोके वाढणार
पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या मुलांना नव्या नियमांचा फटका बसण्याची शक्यता