कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात तुर्तातुर्त मनाई, प्रकरणाला नवे वळण
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 2, 2023 19:25 IST2023-12-02T19:24:14+5:302023-12-02T19:25:07+5:30
दिवाणी न्यायालयाचा निकाल

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात तुर्तातुर्त मनाई, प्रकरणाला नवे वळण
कोल्हापूर : कोल्हापुरच्या सिनेसृष्टीची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात आता नवे वळण आले आहे. या प्रकरणात दिवंगत लता मंगेशकर यांचा महालक्ष्मी स्टुडिओच्या आधी लालचंद छाबरीया यांच्याशी व्यवहार झाला आहे. त्या आधारे दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर कोल्हापूर यांनी महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी यांनी या मिळकतीचे स्वरुप बदलू नये, त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण करू नये अगर ती मिळकत विक्री करू नये अशी दाव्याच्या निकालापर्यंत तुर्तातूर्त मनाई ताकीद २७ नोव्हेंबरला दिली आहे. त्यामुळे आता स्टुडिओ शासनाकडे हस्तांरित करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी, दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २०१९ साली लालचंद परशराम छाबरिया यांच्याशी जयप्रभा स्टुडिओबाबत तोंडी करार करून २ कोटी रुपये खात्यावर पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर पुढील ॲग्रीमेंट होणार होते, त्यानुसार छाबरिया यांनी त्यांच्या खात्यावर आरटीजीएसने २ कोटी ३० लाख रुपये पाठवले, मात्र त्यानंतर लता मंगेशकर आजारी पडल्या.
दरम्यान कोरोना काळात लतादिदी व कुटूंबियांनी महालक्ष्मी स्टुडिओज एलएपी यांना जयप्रभा स्टुडिओ विकला. लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर छाबरिया यांना स्टुडिओची विक्री झाल्याचे कळाले. त्यानंतर २४ मार्च रोजी त्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन २७ नोव्हेंबरला न्यायालयाने हा तुर्तातुर्त मनाई आदेश केला आहे. छाबरिया यांच्यावतीने ॲड. अरविंद मेहता यांनी कामकाज पाहिले. या आदेशामुळे स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.