कुरुंदवाड पोलीस ठाण्याची प्रतिमा डागाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:16+5:302021-03-24T04:22:16+5:30
येथील पोलिसांची अवैध व्यावसायिकांशी सलगी आणि आर्थिक हितसंबंध यामुळे पोलीस ठाण्याची प्रतिमा डागाळली आहे. दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ...

कुरुंदवाड पोलीस ठाण्याची प्रतिमा डागाळली
येथील पोलिसांची अवैध व्यावसायिकांशी सलगी आणि आर्थिक हितसंबंध यामुळे पोलीस ठाण्याची प्रतिमा डागाळली आहे. दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नूर काले याच्या फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट प्रकरण आणि त्यानंतर घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली. त्यामुळे अवैध व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.
येथील पोलीस ठाण्याअंतर्गत २७ गावे येतात. कर्नाटक सीमाभाग असल्याने गुटखा, मद्य यासह अवैध वाहतूक, चोरी नित्याचीच असते. पोलीस ठाण्याअंतर्गत गावांमध्ये अवैध व्यवसाय राजरोसपणे चालतात. अवैध व्यावसायिकांनी पोलिसांना अर्थबळ देत असल्याने कॉन्स्टेबलपासून पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोलीस ठाण्यात येण्यासाठी केवळ इच्छुकच नव्हे, तर त्यासाठी दामही मोजण्याची तयारी असते.
अवैध व्यावसायिकाकडून पोलिसांना आर्थिक बळ मिळत असल्याने या व्यावसायिकांचीच पोलीस ठाण्यात चलती आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिक गावात दहशत निर्माण करत असून सर्वसामान्यांपुढे पोलिसांना कमी लेखले जात आहे. इतकेच नव्हे तर गतवर्षी दत्तवाड येथील जुगार अड्डयावर छापा टाकल्यानंतर जुगार चालक पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता. इतके होऊनही अवैध व्यावसायिकांची पोलीस ठाण्यात ऊठबस सुरू असते. त्यामुळे ज्या त्या भागातील गावातील दहशतीवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
चौकट - शिवसैनिकांकडून पोलिसांची पोलखोल
दत्तवाड आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी शिवसेनेने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासमोर पोलिसांची अवैध व्यावसायिकाबरोबर असलेली सलगी, आर्थिक हितसंबंध व त्यांना दिली जाणारी सन्मानाची वागणूक याचा पाढा वाचून पोलिसांचीच अब्रू काढली. पोलिसांच्या चुकीमुळे अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांना शिवसैनिकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागले.