बाचणी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन
By Admin | Updated: April 7, 2015 01:31 IST2015-04-06T21:23:12+5:302015-04-07T01:31:48+5:30
तक्रार करूनही दुर्लक्ष : शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात; पर्यावरणावर मोठा परिणाम

बाचणी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन
सडोली खालसा : करवीर तालुक्यातील बाचणी ते सडोली खालसा परिसराच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून गौण खनिज उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. या अवैधरीत्या गौन खनिज उत्खननाकडे मंडल अधिकारी, तलाठी दुर्लक्ष करत असल्यामुळे ठेकेदारांचे उखळ पांढरे होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गौन खनिज मिळविण्यासाठी डोंगर उद्ध्वस्त होत असल्याने त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे.बाचणी व सडोली खालसा ही दोन गावे जवळ-जवळ असूनही सडोली गावचा परिसर हळदी मंडल अधिकारी अंतर्गत, तर बाचणी गाव बीड मंडल अधिकारी अंतर्गत येतो. या दोन्ही गावची शीव एकच असून, या गावाच्या हद्दीतील खिंड या क्षेत्राजवळ मोठमोठे डोंगर आहेत. याठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ठेकेदारांकडून व महसूल विभागाच्या आशीर्वादामुळे गौन खनिज उत्खनन होत आहे, तर तुळशी नदीपात्रातही अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. याकडे सरकारी बाबूंनी दुर्लक्ष केल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, तर ठेकेदार मालामाल होत आहेत.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे अवैध उत्खनन काही ठेकेदारांकडून सुरू असतानाही एकदाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यांच्याकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पोलीसपाटलांनी हे उत्खनन थांबविले व घटनेचा पंचनामा केला. परंतु, बीड मंडल अधिकाऱ्यांनी पोलीसपाटलांवर दबाव टाकून हे प्रकरण मागे घ्या, असे सांगितले. तसेच उत्खनन थांबविण्यास सांगितले. मात्र, आजही हे गौनखनिज उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. याकडे करवीर उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून शासनाला कोट्यवधी रुपयांचा कर रूपाने चुना लावणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)
दोन वर्षांपासून खिंडी परिसरात मोठ्या प्रमाणात गौनखनिजाचे उत्खनन सुरू आहे. वेळोवेळी याची माहिती व पकडून देऊनसुद्धा याकडे महसूल विभागाने का दुर्लक्ष केले याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. याकडे तहसीलदारांनी लक्ष घालून लाखो रुपयांचा कर वाचवावा.
- बंडोपंत मारुती कुंभार, पोलीसपाटील, बाचणी, ता. करवीर.