दगडाला देतोय तो देवपण!
By Admin | Updated: October 14, 2014 23:15 IST2014-10-14T23:02:43+5:302014-10-14T23:15:40+5:30
शिक्षण केवळ इयत्ता तिसरी : कलेच्या जोरावर गडहिंग्लज तालुक्याची ठरतेय ओळख

दगडाला देतोय तो देवपण!
संजय थोरात - नूल -शिक्षण केवळ इयत्ता तिसरी. मराठी नीट बोलता येत नाही. हिंदी वाचता येत नाही; परंतु देवाने हाती दिलेल्या कलेच्या जोरावर गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे एक युवक दगडाला देवपण देतोय. सुरगीश्वर मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी या कलावंतास मठात आश्रय दिला आहे.
बसाराम थावराजी गारसीम रजपूत (वय २८) असे या मूर्तिकाराचे नाव आहे. तीन वर्षांपासून सुरगीश्वर मठात तो वास्तव्यास आहे. मोफत जेवण, निवासाची सोय मठाने केली आहे. वयाच्या १०व्या वर्षापासून बसाराम दगडात रमलाय. सहा इंचापासून पाच फुटांपर्यंत तो दगडात वेगवेगळ्या देव-देवतांच्या सुबक व रेखीव मूर्ती घडवितो. आतापर्यंत त्याने पाचशेहून अधिक मूर्ती तयार केल्या आहेत. मठाच्या जीर्णोद्धारावेळी योगिनीची मूर्ती घडविण्यासाठी त्याला महास्वामीजींनी खास राजस्थानातून आणला आणि तो इथेच रमला.
गणपती, हनुमान, दत्त, दुर्गामाता, काळभैरव, नंदी, महादेवाची पिंड, कासव अशा अनेक देवतांच्या मूर्ती तयार करताना काळ्या दगडातदेखील तो प्राण आणण्याचा प्रयत्न करतो. छायाचित्रात दाखविलेल्या हुबेहूब मूर्ती तयार करण्यात त्याचा हातखंडा आहे. शिवाय मंदिराची कोरीव आरास, घराच्या चौकटींच्या डिझाईनचेही तो काम करतो. गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरीच्या मंदिराचे कोरीव काम त्याने केले आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील अनेक मंदिरांत त्याने घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पोट भरण्यासाठी केवळ शिक्षणच लागते असे नाही, तर एखादी कलासुद्धा पोट भरण्यास पुरेशी असते. बालवयात मी सरस्वतीची उपासना केली. त्यामागून लक्ष्मी हाती आली, अशी प्रतिक्रिया बसारामने दिली. ही कला सातासमुद्रापार पोहोचवायची त्याची जिद्द आहे. त्यासाठी सुरगीश्वर मठाचे त्याला पाठबळ मिळत आहे.
सुरगीश्वर मठात मुलांना मोफत वैदिक शिक्षण दिले जाते. कलावंताच्या कलेला चालना देण्यासाठी बसारामला मठात आश्रय दिला. तो आता मठाचा शिष्यच बनला आहे.
- चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी,
मठाधिपती सुरगीश्वर मठ, नूल
बसाराम रजपूत याने दगडात कोरलेल्या देवतांच्या विविध मूर्ती.