आपण एकत्र आल्यास सगळ्यांना उधळून लावू, महाडिक यांची डरकाळी : आमदार आवाडे यांच्याशी तासभर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST2021-03-31T04:23:46+5:302021-03-31T04:23:46+5:30
इचलकरंजी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांची येथील निवासस्थानी ...

आपण एकत्र आल्यास सगळ्यांना उधळून लावू, महाडिक यांची डरकाळी : आमदार आवाडे यांच्याशी तासभर चर्चा
इचलकरंजी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांची येथील निवासस्थानी भेट घेतली. तुम्ही आमच्यासोबत राहा, आपण एकत्र आल्यास सगळे उधळून लावू, असा विश्र्वास महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी राजकीय जुळवाजुळवीची समीकरणे सोडविण्यावर तासभर भर दिला.
चर्चेमध्ये राहुल आवाडे यांच्या उमेदवारीसंदर्भात स्पष्टपणाने चर्चा झाली नसली तरी राहुल हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले. आवाडे यांनी थेटपणे उमेदवारी मागितली नाही, परंतु त्याभोवतीच चर्चा झाली. चर्चेत महाडिक म्हणाले, तुम्ही सोबत आल्यास आमची ताकद वाढेल. तुम्हाला घेऊनच काम करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत राहा. आपण एकत्र आल्यास सगळ्यांना उधळून लावू शकतो.
गोकुळ संघाच्या संबंधित शिरोळ व हातकणंगले तालुक्यात आवाडे यांना मानणाऱ्या सुमारे २२५ संस्था आहेत. जवाहर साखर कारखाना व इतर संस्थांच्या माध्यमातून आवाडेंचे दोन तालुक्यात मोठे जाळे आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत.
‘गोकुळ’ चांगली चालावी..
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी, गोकुळ दूध संघ ही जिल्ह्यातील मोठी व महत्त्वाची संस्था आहे. ती व्यवस्थित चालवावी, असे मत व्यक्त केले.
फोटो
३००३२०२१-कोल-महाडिक
‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित होते.